पनवेल : २0१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकापचे तत्कालीन उमेदवार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सदर याचिकेत खारघर येथे एका गाडीत पैसे सापडल्याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि खांदेश्वर येथे दोन व्यक्तींकडे पैसे सापडल्याबद्दल खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता.याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक गैरप्रकार केल्याचा आरोप आमदार बाळाराम पाटील यांनी केला होता. तसेच जासई येथे असलेल्या सर्व्हे क्र . ६१ आणि सर्व्हे क्र . ५७/१या दोन मिळकती आमदार प्रशांत ठाकूर यांचे नावे असतानासुध्दा त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही आणि त्याचप्रमाणे कल्पवृक्ष इन्फ्राप्रोजेक्ट या भागीदारी संस्थेत भागीदार असताना, त्या भागीदारी संस्थेच्या मिळकतीत असलेला हिस्सा आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केला नव्हता, असा मुद्दा बाळाराम पाटील यांनी उपस्थित करून त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळून त्यांची निवडणूक रद्दबातल करण्याची मागणी सदर निवडणूक याचिकेत केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.सदर निवडणूक याचिकेच्या कामकाजात याचिकाकर्ते बाळाराम पाटील यांच्यासह एकूण १२ साक्षीदारांचा पुरावा नोंदविण्यात आला आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: साक्ष दिली. दोन्ही बाजूचा पुरावा आणि युक्तिवाद विचारात घेवून निर्णय दिला.
आमदार प्रशांत ठाकूर विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:29 AM