पामबीचवर भरधाव कारचा अपघात; चालक जखमी, मद्यधुंद अवस्थेत पळवली कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:15 AM2024-04-15T09:15:51+5:302024-04-15T09:16:02+5:30
पामबीच मार्गावर वाशी येथे भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पामबीच मार्गावर वाशी येथे भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. यामध्ये चालक जखमी झाला असून, अपघातावेळी तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. यामध्ये इतर वाहनचालक थोडक्यात बचावले आहेत. पामबीच मार्गावर सतरा प्लाझालगत शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात घडला. अरेंजा चौकाकडून कोपरीकडे जाणारी एक कार भरधाव वेगात पळवली जात होती. त्याच्याकडून अनेक वाहनांना धोकादायक पद्धतीने कट मारला जात होता. यामुळे सदर मार्गावर अनेकजण थोडक्यात बचावले.
मात्र, सतरा प्लाझालगतच्या सिग्नलच्या ठिकाणी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्याची कार समोरील दुचाकीला ठोकून नाल्याच्या सुरक्षा कठड्याला धडकली. अपघातावेळी कार इतक्या वेगात होती की, तिच्या धडकेने नाल्याच्या सुरक्षा कठड्याला तडा गेला. या अपघातामध्ये थोडक्यात इतर वाहनचालक बचावले. कारचालक जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला बाहेर काढले असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. यामुळे नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देऊन त्यालाही पोलिसांच्या ताब्यात दिले.