- नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरातील लँडमार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंडर्स पार्कमधील हायटेक राइडचे आकर्षण कमी झाले आहे. जवळपास तीन वर्षांमध्ये ७ लाख ८४ हजार २६९ नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. यामधील चार हायटेक राइडचा फक्त तीन लाख नागरिकांकडूनच वापर झाला आहे. राइडपेक्षा टॉय ट्रेनला अधिक पसंती मिळू लागली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास २०० उद्याने आहेत. प्रत्येक सेक्टर व विभागामध्ये चांगले उद्यान तयार करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सर्व चांगली उद्याने नेरूळ परिसरात विकसित केली असून, दिघा परिसरातील नऊ प्रभागांमध्ये फक्त एकच उद्यान आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मध्ये तब्बल ९० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर वंडर्स पार्क विकसित करण्यात आले आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात फेब्रुवारी २०१० मध्ये करण्यात आली व डिसेंबर २०१२ मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील सर्वात आकर्षक उद्यान असल्यामुळे प्रवेशासाठी नागरिकांच्या प्रचंड रांगा लागू लागल्या होत्या. या उद्यानामध्ये चार हायटेक राइड व टॉय ट्रेन बसविण्यात आली आहे. सुरुवातील राइडच्या तिकिटासाठीही एक तासाची रांग लावावी लागत होती. परंतु उद्यानाला जवळपास तीन वर्षे होत आली असून, या राइडचे आकर्षण नागरिकांना राहिलेले नाही. चारही हायटेक राइडचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळू लागला आहे. उद्यान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७,८४,२६९ नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. पालिका ३५ रुपये व लहान मुलांसाठी २५ रुपये प्रवेश शुल्क आकारत असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात उद्यानास भेट देत आहेत. प्रवेश शुल्कातून पालिकेस तीन वर्षांत २ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. राइडचा फक्त ३ लाख २० हजार नागरिकांनीच केला आहे. याचा अर्थ एक राइडचा सरासरी ८० हजार नागरिकांनीच तीन वर्षांत वापर केला आहे. हायटेक राइडपेक्षा टॉय ट्रेनची मागणी वाढत आहे. तीन वर्षांमध्ये तब्बल २ लाख ५० नागरिकांनी याचा वापर केला असून, पालिकेस ६२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. उद्यानामधील प्रवेश शुल्क व राइडमधून पालिकेस ४ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. उत्पन्नाचा आकडा मोठा असला तरी देखभालीचा खर्चही वाढत आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. पालिकेने फुड कोर्ट सुरू केल्यामुळे उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. परंतु राइडमध्ये नावीण्य आणले नाही तर त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. याशिवाय अॅम्पी थिएटर व इतर गोष्टींचाही काहीच उपयोग होत नाही. पालिकेने लॉन भाड्याने देण्याचा निर्णय घेतला असून, अशाच प्रकारे नवीन योजना राबवल्या नाहीत तर हे उद्यान पांढरा हत्ती ठरणार आहे. स्वागत कक्ष कोणासाठी ? महापालिकेने उद्यानाच्या एक कोपऱ्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून आलिशान स्वागत कक्ष तयार केला आहे. हा स्वागत कक्ष व त्याच्या आजूबाजूला मोठी जागा राखीव ठेवली आहे. सामान्य नागरिकांना या वास्तूकडे फिरकू दिले जात नाही. व्हीआयपी नागरिकांसाठी ते असल्याचे सांगितले जाते. येथील सुरक्षारक्षक येथे माजी खासदार साहेब वारंवार येत असल्याचे नागरिकांना सांगतात. या वास्तूचा उपयोग काय व त्यावर होणारा हजारो रुपयांच्या खर्चाचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. उद्यानामध्येच जाळतात कचरामहापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करावा, असे आवाहन पालिका करते. कचरा जाळू नये असेही सांगितले जाते. परंतु पालिकेच्या मालकीच्या वंडर्स पार्कमध्ये मात्र प्लास्टिक व इतर कचरा येथील कचरा कुंडीतच जाळला जात आहे. कचरा जाळल्यामुळे परिसरात प्रदूषण होत असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरवासीयांचे आकर्षण ठरलेल्या उद्यानामधील राइडचे आकर्षण मात्र संपले आहे. पालिकेने यामध्ये वैविध्य आणले पाहिजे. ट्रॅफिक उद्यान अद्याप सुरू केले नाही. अॅम्पी थिएटरचा वापर होत नाही. येथील शिल्पं तुटली आहेत. सायन्स पार्कच्या भूखंडाचा विकास होत नाही. खासदार निधीतून बांधलेल्या वास्तूचा सामान्यांसाठी काहीच उपयोग होत नाही. महापालिका प्रशासनाने ठोस नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. - सुमित्र कडू, विभागप्रमुख, शिवसेना