वैभव गायकर / पनवेलसध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, त्याचा उपयोग प्रशासकीय कारभारात झाला तर नक्कीच अनेक गोष्टी सोप्या होतील. नव्याने स्थापन झालेली पनवेल महानगरपालिका अशाच हायटेक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण आराखडा तयार करणार आहे. यासाठी ड्रोन व लिडार या अत्यंत प्रगत प्रणालीचा वापर केला जाणार आहे. याकरिता महानगरपालिकेने निविदा काढलेली असून लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरु वात होणार आहे. विकास आराखडा तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करणारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिलीच पालिका ठरणार आहे. पनवेल महापालिका ही जिल्ह्यातील पहिलीच महापालिका आहे. १ आॅक्टोबरपासून ही पालिका अस्तित्वात आली आहे. त्यानंतर या पालिकेच्या आयुक्त व प्रशासक पदाची धुरा डॉ. सुधाकर शिंदे हे सांभाळत आहेत. स्मार्ट सिटी उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे. यापैकी डीपी तयार करण्यासाठी ड्रोन प्रणालीचा वापर हादेखील स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ११० चौ.कि.मी. आहे. या पालिकेत २९ महसुली गावांसह, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या सिडको नोडचा समावेश के लाआहे. ड्रोनद्वारे विकास आराखडा तयार करताना पालिका क्षेत्राचा भू वापर कसा आहे, इको सेन्सेटिव्ह झोन कोणता, क्षेत्र किती मोठे आहे, नद्या, तलाव आदी वेब मॅप तयार केला जाणार आहे. यापूर्वी हे सर्व काम मानवी पद्धतीने केले जात होते. मात्र, ही प्रक्रि या अत्यंत वेळखाऊ आहे. ही सर्व प्रक्रि या तंत्रज्ञानाचा वापर करून वापरली जाणार असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी जीपीएसच्या खुणा केल्या जाणार आहेत. ड्रोन व लिडार ही अत्यंत प्रगत प्रणाली आहे. जगभरात ४ ते ५ वर्षांपासून या प्रणालीचा वापर केला जात आहे. जीपीएसद्वारे भूभागावर केलेल्या खुणा या ड्रोनमध्ये अपलोड होणार आहेत. त्याद्वारे खुणा कॅच करून ड्रोनमध्ये महापालिका क्षेत्राचा संपूर्ण लेखाजोखा जमा होणार आहे. यामुळे प्रॉपर्टी टॅक्समध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारात मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. त्यामुळे अधिकारी वर्गासह टॅक्सधारकाचाही मोठा वेळ वाचणार आहे. यामुळे महापालिका क्षेत्रासह जगभरात बसलेल्या नागरिकाला एका क्लिकवर पनवेल महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यांची माहिती मिळणार आहे. (वार्ताहर) असा होणार फायदा च्यापूर्वी महानगरपालिकेचा विकास आराखडा हा मानवी पद्धतीने मोजमाप करून केला जात होता. यामध्ये १०० टक्के पारदर्शकता नसायची, तसेच ही प्रक्रि याही वेळखाऊ होती. मात्र, ड्रोन, लिडार या तंत्रज्ञानांचा वापर केल्याने प्रॉपर्टी टॅक्समध्येही पारदर्शकता येणार आहे. टॅक्सधारक, पालिका अधिकारी यांच्यामधील व्यवहारदेखील डिजिटल होणार आहेत. आपल्या परिसरातील एखादी समस्या व्हिडीओ, फोटो काढून प्रणालीद्वारे थेट महानगरपालिकेला पोहोचणार आहे. त्यामुळे नेहमीसारखी पत्रव्यवहाराची गरज नसून, या प्रणालीमुळे वेब बेस अॅप्लिकेशन महानगरपालिकेकडे करता येणार आहे. भविष्याच्या नियोजनासंदर्भात इत्थंभूत माहिती या प्रगत प्रणालीमुळे उपलब्ध होणार आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनेतून अचूक असे मोजमाप याद्वारे होणार आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येणार आहे. ड्रोन व लिडार या अत्यंत प्रगत प्रणाली याकरिता वापरात येणार असून एका क्लिकवर पालिकेची माहिती उपलब्ध होणार आहे. - डॉ . सुधाकर शिंदे, आयुक्त व प्रशासक, पनवेल महानगरपालिका पालिका करणार जनजागृती : लवकरच ड्रोन, लिडार या प्रगत प्रणालीद्वारे भूवापराच्या मोजमापाला पालिका क्षेत्रात सुरु वात होणार आहे. याकरिता पालिका नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील यासंदर्भात सहकार्याचे आवाहन पालिका करणार आहे.
विकास आराखड्यासाठी हायटेक तंत्रज्ञान
By admin | Published: February 22, 2017 6:44 AM