- नामदेव मोरेनवी मुंबई - पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. चार दिवसामध्ये मुंबई बाजार समितीमधून तब्बल ८ हजार टन फळांची विक्री झाली आहे.मुंबई, नवी मुंबई व उपनगर ही कृषी व्यापाराची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फक्त मुंबई बाजारसमितीमध्ये प्रत्येक वर्षी दहा हजार कोटी रूपयांची उलाढाल होत असते. प्रचंड उलाढाल होत असल्यामुळे बाजारसमितीने वस्तूंची विभागणी करून त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. कांदा, बटाटा, धान्य, भाजीपाला, मसाला व फळांसाठीही स्वतंत्र मार्केट उभारण्यात आले आहे. आंबा हंगाम सुरू झाला की फळ मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात उलाढाल होते असते.आंबा हंगाम संपला की पावसाळ्यातील चार महिने आवक कमी होत असते. ग्राहकांकडूनही मागणी कमी होत असते. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे मार्केटमधील मंदिचा कालावधीही नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील उपवास सुरू झाल्यामुळे हाता फळांची आवक मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. २५ नोव्हेंबरला मार्केटमध्ये फक्त ८६० टन फळांची आवक झाली होती. २७ नोव्हेंबरला ही आवक तब्बल २२५८ वर गेली आहे. तीन दिवसामध्ये आवक तिप्पट झाली आहे. सोमवारपासून सातत्याने आवक वाढू लागली आहे. चार दिवसामध्ये जवळपास ८ हजार टन फळांची आवक होवून विक्रीही झाली आहे.बाजारसमितीमध्ये देश, विदेशातून फळांची आवक होत आहे. सद्यस्थितीमध्ये सर्वाधीक आवक सफरचंदची होत आहे. काश्मीर व हिमाचलसह विदेशातूनही सफरचंद विक्रीसाठी येत आहेत. सरासरी ८०० ते १२०० टन माल विक्रीसाठी येवू लागला आहे. कर्नाटक परिसरातून कलींगड, सांगलीमधून डाळींब, राज्यातून व कर्नाटकमधून सीताफळ विक्रीसाठी येवू लागला आहे.पुणे, सांगली व सोलापूरमधून पपई विक्रीसाठी येवू लागली आहे. किवी, सफरचंद व इतर फळांची विदेशातून आवक होवू लागली आहे. मुंबईमध्ये विदेशी फळांमध्ये किवीची मागणी वाढू लागली आहे. डेंगू, मलेरियाचा अजार झाल्यानंतर शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स वाढण्यासाठी किवी व इतर तंतूमय फळे खाण्यास पसंती दिली जावू लागली आहे.मार्गशीर्षमधील उपवासामुळे केळी, सफरचंद,पेरू, बोर, चिकू या फळांना ग्राहकांकडून पसंती दिली होती. उपवासासाठी ६० ते १०० रूपयांना पाच फळे विकली जात होती. मुंबईमध्ये पुढील एक महिना फळांची मागणी वाढत राहील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब, कलींगड यांची मोठ्याप्रमाणात आवक सुरू आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून फळांची आवक सुरू आहे. विदेशातूनही काही फळांची आवक होत असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे दोन दिवसात आवक वाढली होती.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी
मार्गशीर्षमध्ये फळांची मागणी वाढली, एपीएमसीत सफरचंदाची सर्वाधिक आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:06 AM