उत्तम कायदा सुव्यवस्थेमुळे राज्यात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 01:09 PM2018-01-10T13:09:14+5:302018-01-10T13:56:25+5:30
महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
नवी मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले ,पोलीस हे अत्यंत तणावात काम करतात. कायदा सुव्यवस्था उत्तम राखून आपल्या जिवीत व मालमत्तेचे रक्षण करतात. त्यांना विरंगुळा मिळतानाच शिस्तही बळावली पाहिजे यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. यातून पुढे येणाऱ्या पोलीस खेळाडुंनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी पोलिसांनी विकसित केलेले सिडकोचे मैदान पोलिसांना उपलब्ध करुन देण्याबाबत सिडकोला योग्य ते निर्देश देऊ,असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. या मैदानावर खेळाडुंसाठी उत्तम सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुंतवणूक व रोजगार संधी असणारे राज्य आहे. याला कारणीभूत इथल्या पोलिसांनी राखलेली उत्तम कायदा सुव्यव्यस्था आहे. पोलीस दल हे एका परिवाराप्रमाणे असून परिवारातील सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. पोलिसांच्या घरांबाबत शासनाने ठाम भूमिका घेतली. येत्या तीन वर्षात पोलिसांना चांगली घरे उपलब्ध होतील. तसेच पोलिसांचे स्वतःचे घर असावे यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. पोलीस दलाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील असा विश्वास व्यक्त करुन फडणवीस म्हणाले की, खेळातील सहभाग महत्त्वाचा असतो. यामुळे खिलाडुवृत्ती वाढीस लागते. खेळाडू व्यक्तीगत जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर अयशस्वी होत नाही, त्यामुळे पोलिसांनी खेळाचे महत्त्व जपावे, असे त्यांनी सांगितले.