उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांखालील उद्याने जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:56 AM2018-08-04T03:56:43+5:302018-08-04T03:56:54+5:30
शहरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने जीवघेणी ठरू लागली आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या विद्युत वायरींचे शॉर्टसर्किट व स्फोटाच्या घटनांमध्ये उद्यानात आलेले नागरिक जखमी होऊ लागले आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने जीवघेणी ठरू लागली आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या विद्युत वायरींचे शॉर्टसर्किट व स्फोटाच्या घटनांमध्ये उद्यानात आलेले नागरिक जखमी होऊ लागले आहेत, यामुळे लाखो रुपये खर्चून विकसित केलेली उद्याने बंद करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.
शहराच्या रहिवासी क्षेत्रातून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या जागेत पालिकेने उद्याने विकसित केली आहेत. यापूर्वी त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण व डेब्रिजचे ढीग साचत होते. परिणामी, शहराचे होणारे विद्रूपीकरण टाळण्यासाठी तिथली जागा विकसित करण्यात आलेली आहे. त्यानुसार ऐरोली, नेरुळ, बेलापूर यासह इतर अनेक ठिकाणी उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या जागेत सुसज्ज उद्याने पाहायला मिळत आहेत. यासाठी पालिकेच्या तिजोरीसह इतर निधीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. या सर्वच उद्यानांत सकाळ-संध्याकाळ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले विरंगुळ्यासाठी जमलेली असतात; परंतु उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखालील उद्यानातला क्षणभराचा विरंगुळा त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलू शकतो. तशी धोक्याची सूचना देणारा प्रसंग गुरुवारी रात्री ऐरोलीत घडला आहे. या दुर्घटनेतील गंभीर जखमी महिला मृत्यूशी झुंज देत आहे. मृणाल अनिल महाडिक (५२), असे त्यांचे नाव असून, त्या ऐरोली सेक्टर ९ च्या राहणाºया आहेत. त्याच परिसरातील साधना तिखे (५४) यांच्यासोबत त्या रात्री ७ वाजण्याच्या सुमारास सेक्टर ५ येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखालील उद्यानात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. उद्यानातील जॉगिंग ट्रॅकवर त्या फिरत असताना, उच्चदाबाच्या विद्युत वायरीच्या इन्शुलेटरचा स्फोट झाला. स्फोटामुळे त्याचे तुकडे संपूर्ण परिसरात उडाले असता एक तुकडा महाडिक यांच्या डोक्यावर पडला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या. घटनेवेळी उद्यानात २० ते २५ महिला व पुरुष फेरफटका मारण्यासाठी आले होते. त्यांनी स्फोटाच्या आवाजामुळे तसेच विजेच्या ठिणग्यामुळे भयभीत होऊन आरडाओरडा करत उद्यानाबाहेर पळ काढला. त्याच वेळी उद्यानाबाहेर भाजीविक्री करणाºया अशोक थोरात यांनी उद्यानात धाव घेत जखमी अवस्थेत कोसळलेल्या मृणाल महाडिक यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांच्यावर सध्या मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत; परंतु इन्शुलेटरचा जड तुकडा डोक्यात पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाली असून, अद्यापही त्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्यांचे पती अनिल महाडिक यांनी सांगितले. मात्र, या दुर्घटनेनंतर त्यांनी पालिकेसह महावितरण कंपनीकडे दुर्घटनेचा जाब विचारला असता, सर्वांनीच जबाबदारी ढकलली आहे, त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेली उद्यानेच, जीवघेणी व गैरसोयीची ठरू लागली आहेत. परिणामी, उच्चदाबाच्या विद्युत वायरीखालील उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याची वेळ पालिकेवर येण्याची शक्यता आहे.
दुसºयांदा घडली दुर्घटना
दुर्घटना घडलेल्या उच्चदाबाच्या वाहिन्यांखालील उद्यानाच्या जागी पूर्वी मोकळ्या जागेत परिसरातील वाहने उभी केली जायची. त्या वेळीही उच्चदाबाची विद्युत वायर तुटून त्याखालील उभ्या वाहनांवर पडली होती. या वेळी सुमारे आठ ते दहा वाहनांचे पूर्ण नुकसान झाले असता, थोडक्यात जीवितहानी टळली होती.
वायरखालीच जॉगिंग ट्रॅक
उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखालील जागेत उद्यान विकसित करताना खबरदारी घेणे आवश्यक होते; परंतु ऐरोलीतील उद्यानात अगदी विद्युत वायरच्या खालीच जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तसेच बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. नियोजनातील अशा त्रुटींमुळे नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवराम रणपिसे यांनी केला आहे.
दुर्घटनेनंतर जखमी मृणाल यांच्या कुटुंबीयांसह नगरसेवक मनोज हळदणकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता महेश भागवत यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत त्यांचा उपचार खर्च देण्याचीही मागणी केली, त्यानुसार भागवत यांनी त्यांच्या अधिकारातील अडीच लाख मदतनिधी तत्काळ देण्याचे आश्वासन दिल्याचे, हळदणकर यांनी सांगितले.
उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली उद्यानाच्या नियोजनातील त्रुटींमुळे घडलेल्या दुर्घटनेत पत्नी मृणाल यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उपचाराचा खर्चही आवाक्याबाहेर आहे. तर या दुर्घटनेला महावितरण कंपनीसह पालिका प्रशासन जबाबदार असून, दोषींवर कारवाई व्हावी.
- अनिल महाडिक, जखमी महिलेचे पती