महामार्ग अंधारात

By Admin | Published: June 28, 2017 03:27 AM2017-06-28T03:27:43+5:302017-06-28T03:27:56+5:30

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी १२२० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही तेथील समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत.

Highway in the dark | महामार्ग अंधारात

महामार्ग अंधारात

googlenewsNext

नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी १२२० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही तेथील समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. राज्यातील सर्वात प्रमुख महामार्ग अंधारात असून, ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवे लावण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. अंधारामुळे अपघातांमध्ये वाढ होत असून रुंदीकरण केल्यापासून महामार्गावरील प्रवास पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक बनला आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. जागतिक दर्जाच्या शहराकडे जाणारा प्रमुख मार्ग म्हणजे सायन-पनवेल महामार्ग. कर्नाटक, आंध्रप्रदेशासह दक्षिणेकडील राज्ये, गोवा व पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारे नागरिक या महामार्गाचा वापर करतात. रोज २ लाखांपेक्षा जास्त वाहने या मार्गावरून ये-जा करत असतात. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या योजनेअंतर्गत २५ किलोमीटर अंतर असणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. रुंदीकरण करताना तीन ठिकाणी नवीन उड्डाणपूल, तीन पादचारी पूल, दहा ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात आले. १०० टक्के कामे पूर्ण होण्यापूर्वीच ६ जानेवारी २०१५ रोजी खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला. यानंतर काही महिन्यांमध्येच शासनाने छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिली. टोलमाफीमुळे महामार्गाची देखभाल करणाऱ्या एसपीटीपीएल कंपनीने शिल्लक कामे करण्यास नकार दिला आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थांबविली असल्याने सद्यस्थितीमध्ये महामार्गावरील पथदिवे बंद झाले आहेत. पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नाही. सानपाडा ते पनवेलदरम्यान अनेक ठिकाणी रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रात्रीच्या वेळी अपघात वाढू लागले आहेत.
१२२० कोटी रुपये खर्च करूनही महामार्ग अंधारात असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे वारंवार अपघात होत आहेत. रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अंधारामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही व वाहने खड्ड्यांत जाऊन चालकांना व प्रवाशांना धक्का बसत आहे. मणक्याच्या व इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. महामार्गावरील अंधार दूर करावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व एसपीटीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र दिली आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्येही दिवाबत्तीच्या योग्य वेळी देखभाल करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला असून, अशीच स्थिती राहिली तर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिग्नल यंत्रणाही नाही
महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने अपघात होत आहेत. रूंदीकरणाचे काम केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सिग्नलही बसविण्यात आलेले नाहीत. सर्वाधिक वाहतूक असलेल्या सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील सिग्नलही बंद आहे. येथून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात वाहने जात असतात. सिग्नल नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. सीबीडी जंक्शनजवळही अद्याप सिग्नल बसविण्यात आलेला नाही. वाहतूक पोलिसांनी सिग्नल बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे; परंतु एसपीटीपीएल कंपनी पुन्हा पैसे नसल्याचे कारण देऊन व सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण सांगत, सिग्नल बसवत नाही. परिणामी, या परिसरामध्ये अपघात होत असून, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वैभवीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले
सीबीडी सेक्टर-२मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत येशी यांच्या मोटारसायकलला रविवारी पहाटे कंटेनरने धडक दिली. या अपघातामध्ये चंद्रकांत यांचा जागीच मृत्यू झाला. सीबीडी सेक्टर-२मध्ये राहणारे चंद्रकांत, पत्नी चेतना व तीन वर्षांची मुलगी वैभवीबरोबर एक खासगी कार्यक्रमासाठी नेरुळला गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्नी व मुलीला घरी सोडले व कामानिमित्त ते पुन्हा नेरुळच्या दिशेने निघाले असताना अपघात झाला. यामुळे येशी कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला आहे. छोटी वैभवी नुकतीच नर्सरीमध्ये जाऊ लागली आहे. तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले असून त्याला जबाबदार कोण? घरामध्ये चंद्रकांत यांचे वृद्ध वडील असून, त्यांनाही मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. शासन, प्रशासन व ठेकेदाराच्या चुकांचा फटका त्यांना बसला असून, त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. काळाने घाला घातलेल्या या कुटुंबीयांची राजकीय नेते, अधिकारी कोणी साधी भेटही घेतलेली नाही. रोजच अपघात होत असून कोणाचा तरी मृत्यू होतोच, अशी भावना वाढीस लागली आहे. येशी यांच्या मृत्यूप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Highway in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.