महामार्ग अंधारातच, फक्त ‘फिफा’साठी लावले होते दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:13 AM2018-07-15T02:13:11+5:302018-07-15T02:13:19+5:30
सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. अनेक महिन्यांपासून वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवेही बंद असून, त्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. मागणी करूनही पथदिवे सुरू केले जात नसल्याने प्रवाशांसह वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईत येण्यासाठी सायन - पनवेल हाच प्रमुख मार्ग आहे. या रोडवरून रोज दोन लाख वाहनांची ये - जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केले. विस्तारीकरणासाठी ठेकेदाराने केलेला खर्च भरून काढण्यासाठी खारघरमध्ये ६ जून २०१५मध्ये टोलनाकाही सुरू केला आहे; परंतु ठेकेदाराने कामे पूर्ण केली नाहीत व नवीन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महामार्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दीड वर्षामध्ये महामार्गाने १०५ बळी घेतले आहेत. वाशी ते कळंबोली दरम्यान २० किलोमीटर रोडवरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. महामार्गावरील विजेच्या पोलवर फुलपाखरांची नक्षी बसविण्यात आली होती. महामार्गावर बटरफ्लाय दिवे असा गवगवा करण्यात आला होता; पंरतु प्रत्यक्षात हे दिवे कधी पेटलेच नाहीत. ‘फिफा’ वर्ल्डकपदरम्यान गतवर्षी महामार्गावरील दिवे सुरू करण्यात आले होते; परंतु ‘फिफा’चे सामने संपताच दिवे पुन्हा बंद झाले आहेत. महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. दीड वर्षामध्ये २५०पेक्षा जास्त अपघात होऊन १०५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक अपघात रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे झाले आहेत. उरण फाटा येथे ९ जुलैला अंधारामुळे टँकर १०० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली होती. तुर्भे शरयू हुंदाई शोरूमजवळ अंधारामुळे गटार दिसत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत.
सानपाडा उड्डाणपुलाजवळ अंधारामुळे आठवड्याला एकतरी अपघात होत आहे. महामार्गावरील पथदिवे सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. खड्डे व विजेच्या समस्यांसाठी आंदोलनही केले आहे; परंतु यानंतरही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. महामार्गावरील पथदिव्यांची नक्की जबाबदारी कोणाची यावरून टोलवा टोलवी सुरू आहे. वाहतूक पोलिसांनीही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
>पालकमंत्र्यांनी दिले आदेश
सायन - पनवेल महामार्गावर अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती. अधिकाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांनाही या विषयी माहिती देता आली नाही. शिंदे यांनी या विषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.
>अंधारामुळे अपघात होणारी ठिकाणे
सानपाडा उड्डाणपूल, तुर्भे शरयू हुंडाई शोरूम समोरील रस्ता, शिरवणे पूल, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपूल, कळंबोली या ठिकाणी अंधारामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
>दीड वर्षातील अपघातांचा तपशील
ठिकाणी अपघात मृत
पनवेल ३९ १४
कळंबोली १८ ०९
खारघर ५० २५
बेलापूर १८ ०७
नेरु ळ ३५ १५
सानपाडा ०८ १२
वाशी ७६ १३
>सायन - पनवेल महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, वारंवार अपघात होत आहेत. खड्ड्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला होता. पथदिवे लवकर सुरू केले नाहीत, तर पुन्हा आंदोलन केले जाईल.
- गजानन काळे,
शहर अध्यक्ष,
मनसे