अंबरनाथ : एका फायरिंग प्रकरणातील विवेक नायडू याचा बदला घेण्यासाठी निघालेल्या तीन आरोपींनी अंबरनाथमध्ये नायडू यांच्या मित्रांना अडून त्यांच्यावर गावठी कट्टा रोखला असता त्यातून निघालेली गोळी आरोपींच्या साथीदाराच्या उजव्या मांडीत लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या फायरिंग प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी आरोपी चंदन भदोरिया व रोहीतसिंग पुना यांना अटक केली असून त्यांचा तिसरा साथीदार अलोक यादव हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चंदन भदोरिया याच्या भावावर विवेक नायडू नावाच्या गुन्हेगाराने अग्निशस्त्राने फायर केले होते. त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या भावावर झालेल्या फायरचा बदला घेण्यासाठी चंदन भदोरिया हा आपले साथीदार रोहितसिंग पुना आणि अलोक यादव यांच्या सोबत अंबरनाथ परिसरात मोटरसायकल वरून फिरत होते. त्यावेळेस अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील गणपत धाबा येथे आतिश पवार व त्याच्या मित्रास अडवून विवेक नायडू याची माहिती दे असे सांगून चंदन भदोरिया याने आपल्या जवळील गावठी कट्टा काढून तो आतिश पवार यांच्यावर रोखला त्याच वेळेस झालेल्या बाचाबाचीत चंदन भदोरिया याच्याकडील गावठी कट्ट्यातील गोळी निघून ती चंदन भदोरिया याचा साथीदार अलोक यादव यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागली.
त्यामुळे जखमी झालेल्या आपल्या साथीदाराला त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान अतिश पवार व त्याचा मित्र त्या ठिकाणावरून पळून गेले. या सगळ्या प्रकाराची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपली यंत्रणा सज्ज करून आरोपी चंदन भदोरिया, रोहितसिंग पुना या दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जनार्दन सोनवणे हे करीत आहेत.