प्राची सोनवणे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकीकडे थरावर थर रचण्यासाठी सुरू असलेले राजकारण, सण-उत्सवांमध्ये केले जाणारे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण बाजूला सारत घणसोली ग्रामस्थांनी सलग ११६ वर्षांपूर्वीची ऐेतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे. मंगळवारपासून या ठिकाणी हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून सलग १६८ तास मृदुंगाचे वादन हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. थरावर थर रचण्याच्या स्पर्धेला मागे टाकत ऐतिहासिक परंपरेनुसार गावातील सहा आळ््यांपैकी एका आळीतील गोविंदांना हा दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो.घणसोली गावात कौलआळी, कोळीआळी, म्हात्रेआळी, चिंचआळी, नवघरआळी, पाटीलआळी अशा सहा गावच्या मुख्य आळ्या आहेत. ही प्रत्येक आळी दिवसातील दोन-दोन तास असे एकूण २४ तास मृदुंगाचे वादन करते. मंगळवारपासून गावातील हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून कृष्णाष्टमीला सांगता होणार आहे. थरावर थर रचून जीवावर बेतणारी अशी ही दहीहंडी साजरी न करता प्रत्येक आळीला दरवर्षी हंडी फोडण्याचा मान दिला जातो. मागील वर्षी पाटीलआळीला हा मान मिळाला असून यंदा कौलआळीचे गोविंदा हंडी फोडणार आहेत. सात वर्षांतून एकदा आळीला हंडी फोडण्याचा मान दिला जात असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी दिली. घणसोलीमधील कौलआळी येथे सुरू झालेला उत्सव तत्कालीन पूर्वजांनी सुरू केला. दूध-दुभत्याचे पदार्थ सलग टिकावे म्हणून या काळात कोरा चहा पिण्याची परंपरा पाळली जाते. शनिवार पाटील, दगडू पाटीलबुवा म्हात्रे अशा विविध स्वातंत्र्यसैनिकांनी, दत्ताजी ताम्हणे अशी लढवय्यी परंपरा असलेल्या असा आगळावेगळा उत्सव साजरा केला जात आहे.नवी मुंबईतील सर्वात मोठा औद्योगिक भाग म्हणून घणसोली हा विभाग ओळखला जातो. या विभागात खारे बेलापूर या परिसरातील कामगार घणसोलीत सहा दशकांपासून अधिक वर्षे कार्यरत आहेत. स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू आणि दत्ताजी ताम्हणे यांच्या पदस्पर्शाने हा भाग पावन झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना निरोप, देवाण-घेवाण करणारी लहान मुलांची वानरसेना या विभागात अर्थात सोनखाडी परिसरात ब्रिटिशांच्या गोटात खळबळ माजवत होती. याच वेळी अनेक संसर्ग पसरवणाºया आजारांनी डोके वर काढले. मात्र, आजार बळावू नये म्हणून अध्यात्म्य हा मार्ग निवडून स्थानिक ग्रामस्थांनी थेट वारकरी पंथाचा आधार घेत कीर्तन-प्रवचन या कार्याला सुरुवात केली होती. या परंपरेला तडा न जाऊ देता आजही अध्यात्म आणि अभंगाची सांगड घालत एकत्र येऊन दहीकाला उत्सव साजरा केला जातो. घणसोलीवासीय आजही पुरातन काळातील ‘गवळीदेव’ या जंगलातील देवाला (श्रीकृष्णाचे रूप) पूजतात. कृष्ण जन्माष्टमीच्या सात दिवस अगोदरपासूनच अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला जातो.१९०१ साली इंग्रजांच्या काळात जमावबंदी असल्याकारणाने देशस्वातंत्र्यासाठी धडे गिरविण्याकरिता अखंड हरिनाम सप्ताहाची शक्कल लढविण्यात आली होती. या उत्सवाला स्वातंत्र्यलढ्याचीही वेगळी परंपरा आजही कायम असून गावकीतील ग्रामस्थ कुठल्याही हेतूशिवाय हा उत्सव तितक्यात उत्साहात साजरा करत आहे.- दीपक पाटील, माजी नगरसेवक.
ऐतिहासिक दहीकाला उत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:38 AM