पनवेल : देशभरात गोपाळकाला व जन्माष्टमीची धूम मंगळवारी पाहावयास मिळाली. पनवेलमध्ये सुमारे २८० वर्षांपेक्षा जास्त काळापासून साजरी करण्यात येत असलेली दहीहंडी आहे. पेशवेकालीन बापट कुटुंबीयांची १२वी पिढी हा उत्सव पनवेलमधील सर्व रहिवाशांच्या उपस्थितीत साजरा करते. या दहीहंडीला ऐतिहासिक महत्त्व असून, १७३० पासून हा सण परंपरेनुसार आजही सुरू आहे.१७२०मध्ये बाळाजीपंत बापट आपल्या कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी बापटवाडा या ठिकाणी पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी बापट वाड्यात असलेल्या देव-देवतांची अभिषेक करून त्यांची सजावट केली जाते. आदल्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्र म भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठ आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. या ठिकाणची दहीहंडी ही मोठ्या उंचीवर बांधली जात नाही. ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात. गोलाकार जमलेल्या या गोपाळांवर जाड्या दोरखंडाची उपट मारली जाते. हादेखील एक परंपरेचाच भाग असल्याचे बोलले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. शेकडो वर्षे ही परंपरा सुरू असल्याने अनेक जण मोठ्या उत्साहात ही दहीहंडी बघण्यासाठी जमत असतात. सध्याच्या दहीहंडीला मॉडर्न स्वरूप प्राप्त झाले असताना, ही पारंपरिक दहीहंडी, संस्कृतीचे दर्शन घडविणारा दहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जात आहे.
बापट वाड्यात ऐतिहासिक दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:08 AM