पनवेलमध्ये दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:06 AM2017-12-19T02:06:05+5:302017-12-19T02:06:21+5:30
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी स्वागत केले आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी स्वागत केले आहे.
पालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच महासभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दारूची दुकाने बंद करण्याची लक्षवेधी मांडली होती तर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी याच विषयाला अनुसरून संपूर्ण पालिका क्षेत्रात दारूबंदी मागणी केली होती. मात्र त्यानंतर या ठरावावर चर्चा झाली नव्हती.
यासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या ठरावाची आठवण पीठासन अधिकारी महापौर डॉ.कविता चौतमोल यांना करून दिली. या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी महापौरांना सभागृहात विचारला, तसेच सत्ताधाºयांची पनवेल महानगरपालिकेला दारूमुक्त करण्याची मानसिकता नसल्याचा आरोप यावेळी केला. या आरोपानंतर सभागृह नेते परेश ठाकूर व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यात वैयक्तिक पातळीवर शाब्दिक चकमक उडाली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हा ठराव मंजुरीसाठी मांडला. लगेचच हा ठराव सर्वानुमते मंजूरही करण्यात आला. विशेष म्हणजे यापुढील कायदेशीर प्रक्रि या किचकट असल्याने पालिकेसमोर ती प्रक्रि या पूर्ण करणे आव्हान असणार आहे.
दारूबंदीची प्रक्रिया जिल्हाधिकाºयांशी संबंधित असल्याने पालिका क्षेत्राला दारूमुक्त करण्यासाठी प्रभागनिहाय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
यापूर्वी पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीने खारघर शहर दारूमुक्तीचा ठराव घेतला होता. तसेच मागील दहा वर्षांपासून दारूबंदीसाठी स्थापन झालेली संघर्ष समिती शासन स्तरावर लढा देत आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
खारघरमध्ये एक दशकापासून दारूबंदी आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही येथील दारूबंदी कायम ठेवण्यात आली आहे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन उभे केले होते. दारूबंदीचा पॅटर्न पूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार असून हे खारघरवासीयांच्या चळवळीचे यश मानले जात आहे.