पनवेल : पनवेल महानगरपालिका मुख्यालयासमोरील शिवकालीन ऐतिहासिक तोफा अडगळीत पडल्या आहेत. मुख्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, यासाठी लागणारे साहित्य व इतर वस्तू तोफांजवळ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल शहरातील बंदराजवळ उत्खननात या शिवकालीन तोफा सापडल्या होत्या. या वेळी या ऐतिहासिक तोफांचे जतन करावे, याकरिता पनवेल नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी या तोफा पनवेल नगरपरिषदेच्या मुख्यालयासमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. याकरिता या तोफांची व्यवस्थितरीत्या रंगरंगोटी केली गेली. मात्र, सध्याच्या घडीला या तोफा अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. मुख्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लागणारे साहित्यही याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या तोफांचे वेगळे महत्त्व आहे. मात्र, पालिकेचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येत आहे. या तोफांजवळ डेब्रिजने भरलेल्या गोणी, मोडकळीस आलेले पाइप, लोखंडी सळ्या आदी ठेवल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. यासंदर्भात मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना विचारणा केली असता, संबंधित ठिकाणी पाहणी करून तत्काळ त्या ठिकाणचे साहित्य बाजुला केले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.