प्रदर्शनातून उलगडला आंदोलनाचा इतिहास
By admin | Published: January 12, 2017 06:18 AM2017-01-12T06:18:56+5:302017-01-12T06:18:56+5:30
नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या
नवी मुंबई : नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवामध्ये चरीकोपरचा ऐतिहासिक शेतकरी संप ते भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांपर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो
नवी मुंबईकरांना भूमिपुत्रांच्या इतिहासाची ओळख करून देण्यात येत आहे.
आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित महोत्सवाला रोज ८ ते १० हजार नागरिक उपस्थित राहू लागले आहेत. आगरी कोळीगीते, लावण्या व मराठी लोककलांच्या कार्यक्रमांसह येथील देवी-देवतांचे दर्शन आणि भूमिपुत्रांच्या यशोगाथेचे प्रदर्शन पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. आगरी कोळी भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाची माहिती नवी मुंबईसह परिसरातील नागरिकांना करून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळख असणाऱ्या चरीकोपरच्या संपाची तपशीलवार माहिती दिली आहे. या संपामुळेच देशात कुळ कायदा लागू झाला. चिरनेरचा जंगल सत्याग्रह, जासई दास्तान फाट्यावरील रक्तरंजित आंदोलन याचा तपशील या प्रदर्शनामध्ये देण्यात आला आहे. आगरी समाजाचे पहिले आमदार व शेतकरीनेते नारायण नागू पाटील, लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासह भूमिपुत्रांच्या आंदोलनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सहकार्याची माहितीही देण्यात आली आहे.
आगरी कोळी हाच मुंबईतील मूळ भूमिपुत्र. कुळ कायदा, साडेबारा टक्के योजना, विमानतळबाधितांचे आंदोलन व इतर सर्व आंदोलनांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा स्वाभीमानी बाणा देशाने पाहिला. देशभरातील प्रकल्पबाधितांच्या आंदोलनाची दिशा भूमिपुत्रांनी बदलली असून, देशाच्या विदेश व्यापारापासून मिठाच्या शोधामध्ये भूमिपुत्रांचेच योगदान असल्याची माहिती प्रदर्शनामधून दिली आहे. प्रत्येक भूमिपुत्रांना व शहरातील प्रत्येक नागरिकांना आगरी कोळी समाजाची यशोगाथा माहीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
सांस्कृतिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी
आगरी कोळी समाजाला ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चरीकोपरचा संप ते गरजेपोटी बांधलेल्या घरांपर्यंतचा लढा असा चळवळीचा भव्य इतिहास लाभला आहे. कोळीगीतांच्या तालावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही ठेका धरण्यास भाग पाडले होते. स्वातंत्र्य चळवळीमध्येही भूमिपुत्रांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात भजन, कीर्तनाचे सूर वर्षभर ऐकायला मिळत असतात. भूमिपुत्रांनी देशाला मिठाची देणगी दिली असून, हा उदात्त इतिहास व समाजाची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक घरामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक नामदेव भगत यांनी दिली.