समाधीस्थळी बनणार इतिहास अभ्यास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:43 AM2019-01-11T03:43:06+5:302019-01-11T03:44:06+5:30
शासनाकडे पाठपुरावा सुरू : बाळाजी चिटणीस यांचे समाधीस्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी
नामदेव मोरे
नवी मुंबई : सुधागड तालुक्यामधील आवंढे येथे स्वराज्यातील अष्टप्रधानांपैकी एक बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. हे समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करावे. पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे. समाधीस्थळी इतिहास अभ्यास केंद्र उभारण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी जिल्हा परिषद, शासन व पुरातत्त्व विभागाकडेही पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची गाथा प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचू लागली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुकाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झालेली होती. गडापासून काही अंतरावर असलेल्या परळीजवळील आवंढे गावच्या हद्दीमध्ये अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो व इतरांना हत्तीच्या पायी देण्यात आले होते. गैरसमजातून बाळाजी आवजी चिटणीस यांनाही शिक्षा देण्यात आली होती; परंतु नंतर ते निर्दोष असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी बाळाजींची छोटी समाधी बनविण्यात आली होती. तीन शतकांपासून ग्रामस्थांनी या समाधीची देखभाल केली आहे. त्रिपुरारी पोर्णिमेला येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थच समाधीची देखभाल करत आले आहेत. ग्रामस्थ व बाळाजींचे वारसदार यांनी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून, त्या माध्यमातून येथे कार्यक्रम केले जातात. ट्रस्टने २०१३ पासून जि. परिषद, राज्य शासन, पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
पाच वर्षांपूर्वी समाधीस्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यानंतर आमदार धैर्यशील पाटील यांनी या परिसरातील रोडसाठी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये २०१७ मध्ये समाधीस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठीचा ठराव मंंजूर केला आहे. समाधीस्थळाजवळील दोन एकर जमीन शासनाने संपादित करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने पुरातत्त्व विभागाला उचित कार्यवाही करण्यास सुचविले आहे. पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक भा. वि. कुलकर्णी यांनी या ठिकाणाची पाहणी करून समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. या ठिकाणी संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतर तेथे इतिहास अभ्यास केंद्र उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
समाधीस्थळाचा असा होणार विकास
च्बाळाजी आवजी चिटणीस ट्रस्टचे अध्यक्ष सातारा येथील शिरीष चिटणीस असून, संजय चिटणीस हे सचिव आहेत. आमदार धैर्यशील पाटील कार्याध्यक्ष असून, साहित्यिक सदानंद मोरे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे व आवंढे येथील इतर मान्यवरही ट्रस्टमध्ये आहेत. मोरे व बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केंद्राची रूपरेषा निश्चित केली आहे.
च्बाळाजी आवजी चिटणीस यांच्या हस्ताक्षरातील २५० पत्रे उपलब्ध आहेत. यामधील काही मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालय व काही कोल्हापूरमधील शाहू दफ्तरात आहेत. ही पत्रे अभ्यासासाठी उपलब्ध केली जाणार आहेत.
च्छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथही येथे ठेवण्यात येणार आहेत. बाळाजी आवजी यांचा इतिहास. खंडोबल्लाळ चिटणीस यांनी केलेले कार्यही चित्ररूपाने येथे रेखाटण्याचा संकल्प असल्याची माहिती संजय चिटणीस यांनी दिली.
रायगड जिल्हा परिषदेने २०१७ ला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागानेही संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. समाधीस्थळाचा विकास करून इतिहास अभ्यास केंद्र तयार करण्याचा संकल्प आहे.
- संजय चिटणीस, सचिव, बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्ट
गावच्या परिसरामध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. ग्रामस्थ वर्षानुवर्षे त्याची देखभाल करत आहेत. या ठिकाणी पौर्णिमेला दीप लावले जातात. समाधीस्थळाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- उत्तमराव देशमुख, सरपंच, आवंढे
सुधागड परिसरामध्ये अनेक महापुरुषांच्या समाधी आहेत. यामधील आवंढेमध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांचीही समाधी आहे. नागरिकांनी इतिहासाच्या खुणा जपून ठेवल्या आहेत.
- जयसिंग गोळे, माजी मुख्याध्यापक, शारदा विद्यालय, पेडली