संपाचा फटका; धान्यासह मसाल्याची आवक कमी; वाटाणा आणि टोमॅटो, कोबीच्या दरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:59 PM2024-01-04T14:59:55+5:302024-01-04T15:00:22+5:30
वाहतूकदारांच्या संपामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होऊ लागली आहे.
नवी मुंबई : वाहतूकदारांचा संप मिटला तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकेवर त्याचा परिणाम सुरूच आहे. बुधवारी धान्यासह मसाल्याच्या पदार्थांची आवक कमी झाली आहे. कांद्याची आवक सुरळीत असली तरी बटाटा व लसणाची आवक मंदावली आहे. धान्य व मसाल्याच्या दरामध्ये फार परिणाम झालेला नाही, परंतु वाटाणा, टोमॅटो, कोबीसह काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
वाहतूकदारांच्या संपामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होऊ लागली आहे. धान्य मार्केटमध्ये सोमवारी २३९ वाहनांची आवक झाली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत १३९ वाहनांची आवक झाली. मसाला मार्केटमध्ये दुपारी दोनपर्यंत ८० वाहनांचीच आवक झाली. फळ मार्केटची आवकही निम्यावर आली आहे.
काही वस्तूंच्या दरांमध्ये वाढ
भाजीपाला मार्केटमध्ये दिवसभरात ५४७ वाहनांची आवक झाली आहे. आवक समाधानकारक असली तरी काही वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांमध्ये हिरवा वाटाणा प्रतिकिलो २५ ते ३५ वरून ४५ ते ५५ रुपयांवर गेला आहे. टोमॅटो १२ ते २८ वरून १५ ते ३३, ढोबळी मिर्ची ३२ ते ५२ वरून ४५ ते ५५ वर पोहोचली आहे. कोबीचे दर दोन दिवसांमध्ये ९ ते १३ रुपये किलोवरून १४ ते २४ रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी बहुतांश सर्व मार्केटमधील आवक सुरळीत होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कांदा आवक सुरळीत झाली असून, दिवसभरात १०९३ टन आवक झाली आहे. बटाट्याची फक्त ५३९ व लसणाची १० टन आवक झाली आहे.