महापालिका शाळांची मैदाने होणार हायटेक
By admin | Published: November 14, 2016 04:34 AM2016-11-14T04:34:52+5:302016-11-14T04:34:52+5:30
शहरातील नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या आवारात मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करत त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त मैदाने उपलब्ध
नवी मुंबई : शहरातील नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या आवारात मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करत त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त मैदाने उपलब्ध करून देण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. २५ आॅक्टोबरपासून शाळेतील मैदानांच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यापैकी २३ शाळांमध्ये मैदाने अस्तित्वात नाहीत तर १८ शाळांमध्ये मैदाने उपलब्ध आहे.
सर्वेक्षणाआधी शहरातील प्रत्येक महापालिका शाळेच्या केंद्र समन्वयकाकडून खेळासाठी आवश्यक गरजा, एकूण उपलब्ध जागा तसेच शाळेतील विद्यार्थी कोणता खेळ खेळू शकतात याचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. महापालिका शाळांकडून मिळालेला अहवालानुसार पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट देऊन जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी महापालिका शाळेच्या मैदानांची पाहणी केली. ज्या शाळेला मैदान नाही अशा शाळेतील मोकळ््या जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी कशाप्रकारे बदल करावे लागतील, जागेचे अचूक मोजमाप तसेच आवश्यक बाबींचा अभ्यास करण्यात आला. याबाबतीत प्राथमिक अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला असून अंतिम अहवाल लवकरच पाठविला जाणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली. प्रशासकीय मान्यता, महासभेत प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर संबंधित बदलाकरिता टेंडर काढले जातील. त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)