नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रामधील जमीन फ्री होल्ड करण्याची मागणी यापूर्वीच शासनाने केली आहे. सामाजिक सेवेसाठी राखीव ठेवलेले भूखंडही फ्री होल्ड व्हावे यासाठी महाविद्यालयाचे शिष्टमंडळासह आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.सिडकोने सामाजिक सेवेसाठी देण्यात आलेले शाळा, कॉलेज, समाज मंदिरे अशा भूखंडांना वापरात बदल न करता सदरचे भूखंडही फ्री होल्ड व्हावे, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली आहे. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान नवी मुंबईतील शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य, सभासद यांच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांची भेट घेतली. सामाजिक सेवेसाठी दिल्या गेलेल्या भूखंडांना वापरात बदल न करण्याची अट घालून सदरचे भूखंड फ्री होल्ड करण्याबाबत चर्चा झाली. असे झाल्यास देण्यात आलेल्या सामाजिक सेवेच्या भूखंडाचाही पुनर्विकास होईल व सदर संस्थांना नागरिकांना सेवा सुविधा प्राप्त करण्यास अधिक कार्यक्षम होतील. सदर बैठकीत शाळांबाबत विविध विषयांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नवी मुंबई भाजपा महामंत्री नीलेश म्हात्रे, उपाध्यक्ष अब्दुल हमीद खान, फादर अलमेडा, फादर अब्राहम जोसेफ, फादर हेन्री डिसुझा,के. थॉमस, जे. मोहंती, संतोष सावंत, निशीत विजयन, विजय गोटमरे, शशी टेंभुरने उपस्थित होते.नवी मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन सदरबाबतच्या मागणीचे निवेदन मला दिले होते. या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.
सामाजिक सेवेसाठीचे भूखंड फ्री होल्ड करा, मंदा म्हात्रेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:32 AM