एचडीएफसी सर्कलवर कोंडी

By admin | Published: August 26, 2015 12:27 AM2015-08-26T00:27:16+5:302015-08-26T00:27:16+5:30

पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नवीन पनवेलकर हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ही कोंडी अधिक होत असल्याचे काही

Hold on HDFC Circuit | एचडीएफसी सर्कलवर कोंडी

एचडीएफसी सर्कलवर कोंडी

Next

पनवेल : पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नवीन पनवेलकर हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ही कोंडी अधिक होत असल्याचे काही वाहनचालकांचे म्हणणे आहे.
नवीन पनवेलकडून पनवेल शहर त्याचबरोबर महामार्गाकडे जाण्यासाठी एचडीएफसी सर्कलवरून जावे लागते. त्याचबरोबर नेरे व तळोजा एमआयडीसीकडे जा-ये करण्याकरिता याच मार्गाचा उपयोग होतो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. सरकारी तसेच खाजगी बँकांची कार्यालये, सिडको तसेच मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालयेही याच मार्गावर आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस येथील गर्दी वाढतच आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचडीएफसी सर्कलची रुंदी सहा वर्षांपूर्वी कमी करण्यात आली. याशिवाय याठिकाणी लाखो रुपये खर्चून सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सिडको, वाहतूक पोलिसांचा समन्वय नसल्याने याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाही. वाहनांच्या रांगा थेट सिडको कार्यालय, मोहिते रुग्णालय, ओरिएंटल बँक आणि महामार्गाच्या पुलापर्यंत जातात.
विशेषत: शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी पुलावर स्कूल बस - व्हॅनची मोठी कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास उशीर होतो. अनेकदा नवीन पनवेलहून पनवेल गाठण्याकरिता पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेकदा रुग्णवाहिका सुद्धा पुलावर अडकून पडल्याने रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याचे प्रकारही घडले आहे. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
(वार्ताहर)

वाहनचालकांना फेरा
पनवेलकडून आलेल्या वाहनांना नवीन पनवेलकडे जायचे असेल तर त्यांना थेट अमरधामपासून वळसा घालून नवीन पनवेल उड्डाणपुलावर चढायचे असा फतवा पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कर्मचाऱ्यांनी काढला होता. आजही तीच परिस्थिती असून त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप होत असून आपले काम हलके करण्याकरिता पोलीस अशा प्रकारे शक्कल लढवीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Hold on HDFC Circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.