नवी मुंबई : करावे सेक्टर ३२ मधील होल्डिंग पॉण्डची दुरवस्था झाली असून साचलेल्या गाळामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. होल्डिंग पॉण्डचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुरुवार, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. या कामाला मंजुरी मिळाली असून याबाबत चर्चा करताना सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील सर्वच होल्डिंग पॉण्डची स्वच्छता करण्याची मागणी केली.
नवी मुंबई शहर हे समुद्र सपाटीपासून जवळ असल्याने भरती-ओहोटी काळात शहरात पाणी शिरू नये, यासाठी होल्डिंग पॉण्ड बनविण्यात आले आहेत. त्यामुळे होल्डिंग पॉण्डला शहराचे सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील काही होल्डिंग पॉण्डभोवती सुशोभीकरण करून जॉगिंग ट्रॅकसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तर मँग्रोजमुळे अनेक होल्डिंग पॉण्ड बकाल अवस्थेत असून होल्डिंग पॉण्ड परिसरात साचलेल्या गाळामुळे परिसरात दुर्गंधी सुटलेली आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. करावे सेक्टर ३२ मधील होल्डिंग पॉण्डची दुरवस्था झाली असून या होल्डिंग पॉण्डमध्ये साचलेल्या गाळामुळे परिसरातील आणि शेजारी असलेल्या ज्वेल आॅफ नवी मुंबई येथील जॉगिंग ट्रॅक वरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर होल्डिंग पॉण्डमधील गाळ काढून परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी मांडला होता. यावर चर्चा करताना सदस्यांनी शहरातील सर्वच होल्डिंग पॉण्डची सुधारणा करण्यात यावी तसेच गाळ काढण्यात यावा, अशी मागणी केली. शहरातील अनेक होल्डिंग पॉण्ड परिसरात मँग्रोज असल्याने गाळ काढताना अडचणी येत आहेत याबाबत न्यायालयात प्रकरण असल्याचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी मँग्रोजबाबत काही अडचणी असल्यास न्यायालयाच्या माध्यमातून त्या तत्काळ सोडविण्यात येतील व त्याबाबत पॉलिसी आणून होल्डिंग पॉण्डची कामे केली जातील, असे सांगितले. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी शहरातील सर्वच होल्डिंग पॉण्डची दुरवस्था झाली असून साचलेल्या गाळामुळे दुर्गंधी येत आहे. आयुक्तांबरोबर पाहणी करण्यात यावी, समस्या सोडविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या कामासाठी ५ कोटी ६९ लाख ८३ हजार रु पये खर्च केले जाणार आहेत.करावे येथील होल्डिंग पॉण्डचे सुशोभीकरण करताना पॉण्डमधील गाळ काढणे, पॉण्डभोवती पाथवे तयार करणे, काँक्र ीट फुटपाथ तयार करणे, लॉन लावणे, झाडे, झुडपे लावणे, पाणीपुरवठ्याची सोय निर्माण करणे, विद्युत व्यवस्था, साइन बोर्ड बसविणे, नाल्याची सुधारणा करणे, पावसाळी गटार बांधणे आदी कामे केली जाणार आहेत.