कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील पावसाळी नाल्यातील पाणी वसाहती बाहेर म्हणजेच जलधारण तलावात सोडले जाते. शनिवारपासून होल्डिंग पॉईंटवरील पंप डिझेल नसल्याने बंद ठेवले आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच कळंबोली वसाहत पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली. सिडकोकडून आपत्ती व्यवस्थापनाकडे जानिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कळंबोली सेक्टर ४ येथे होल्डिंग पॉईंट आहे. या पॉईंटवर सहा पंप बसवण्यात आले आहेत. याद्वारे वसाहतीतील नाल्यातील पाणी पंपाद्वारे जलधारण तलावात सोडले जाते. पुढे ते पाणी रोडपाली खाडीला मिसळते. कळंबोली वसाहत ही समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याने दरवर्षी कळंबोलीत पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाच्या दिवसात हे पंप चोविस तास चालू असतात. त्यामुळे वसाहतीतील पाणी साचण्याचे प्रमाण कमी असते. परंतु शनिवारपासून पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कळंबोली वसाहतीत शनिवारी रात्रीपासूनच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.होल्डिंग पंपासाठी लागणारे डिझेल संपल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले. सिडकोने नेमुन दिलेल्या ठेकेदाराने डिझेल पुरवणे अपेक्षित असताना तसे न झाल्याचे महापालिकेचे आरोग्य निरिक्षक दौलत शिंदे यांच्या पाहणीत लक्षात आले. त्यानुसार ठेकेदाराला जाब विचारताच अरेरावीची भाषा तसेच उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. होल्डिंग पंप बंद असल्यामुळे रविवारी सकाळी अनेक बैठ्या घरात पाणी शिरले होते. तर सेक्टर ४, ६, १०,१४ मधील रस्ते पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले. पाण्याचा निचरा न झाल्याने वसाहतीत दीड ते दोन फूट पाणी साचले होते. काही भागात वाहने बंद पडली होती.रस्त्यावर पाणी साचल्याने दिवसभर त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनले होते. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांच्याशी संपर्क साधला असता होल्डिंग पंपाची पाहणी करुन डिझेल संपले असेल तर त्याबाबत ठेकेदास सूचना केल्या जातील व लवकर पंप चालू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगण्यात आले.कातकर वाडीतही पाणी शिरलेरोडपाली येथील कासाडी नदी लगत असलेली कातकरवाडीत नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घराघरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकांचे नुकसानही झाले आहे. रविवारी पावसाचा जोर वाढल्याने रहिवाशांना महापालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेकडून कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालयात हलविण्यात आले आहे.
डिझेल नसल्याने कळंबोलीतील होल्डिंग पंप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:59 PM