उरणमध्ये होळी, रंगपंचमीचा उत्साह कायम; पीरवाडी, माणकेश्वर बीच हाऊसफुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:11 PM2024-03-25T17:11:42+5:302024-03-25T17:12:14+5:30
उरण परिसरात ठिकठिकाणी रविवारी होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी तरुणांसह आबालवृद्धही रंगपंचमीचे विविध रंग उधळले.पिचकाऱ्या,रंग मिश्रीत पाण्यांनी भरलेले फुगे, विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरात ठिकठिकाणी होळी, रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रंगपंचमीचे रंग उधळल्यानंतर उत्साहित झालेल्या तरुणाई, आबालवृद्धांनी पीरवाडी, माणकेश्वर समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तोबा गर्दी केली होती.यामुळे दोन्ही बीचवरील समुद्र किनारे गर्दीमुळे फुलुन गेले होते.
उरण परिसरात ठिकठिकाणी रविवारी होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी तरुणांसह आबालवृद्धही रंगपंचमीचे विविध रंग उधळले.पिचकाऱ्या,रंग मिश्रीत पाण्यांनी भरलेले फुगे, विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली. धुळवड, रंगपंचमीचे रंग उधळल्यानंतर सोमवारी सकाळी अकरा -बारा वाजल्यानंतर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पीरवाडी, माणकेश्वर बीचवरील समुद्रात तरुणांसह आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.दोन्ही बीचवर झालेल्या तोबा गर्दीमुळे सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेल्या स्थानिक पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.अखेर वाढत्या गर्दीला आणि हौशींच्या आवर घालण्यासाठी पोलिसांनी पीरवाडी, माणकेश्वर बीचवरील समुद्राकडे जाणाऱ्यांना हजारो पर्यटकांना वाहनांसह मध्येच अडवून माघारी पाठविण्याची पाळी आली.यामुळे पोलिस आणि उत्साहात असलेल्या हौशी पर्यटकांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या.
होळीचा उत्सव म्हणजे येथील आगरी-कोळ्यांचा एक पारंपरिक सण.उरण तालुक्यातील करंजा, मोरा आदी. मासेमारी बंदरात आणि समुद्रकिनारी राहणारे आगरी- कोळी बांधव देखील मोठ्या उत्साहात साजरा करतात. वर्षभर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणारे आगरी - कोळी बांधव हे व्यवसायानिमित्त कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहतात. पण, होळीच्या सणानिमित्त मच्छिमार बांधव हे आपल्या होड्या घेऊन घरी माघारी परततात. यावेळी मच्छिमार होड्यांची पूजा करतात.
होड्याना फुलं,रंगीबेरंगी पताकांचे तोरण लावून सजवल्या जातात.आणि समुद्रात कुटुंब, नातेवाईकांसह फेर फटका मारुन होळीचा हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतात.रविवारीही उरणच्या मोरा, करंजा बंदरात होळीचा पारंपरिक सण मच्छीमारांनी साजरा केला.उरणमध्ये दुसऱ्या दिवशीही रंगाची उधळण करीत धुळवड साजरी करण्यात आली.होळी आणि धुळवडीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसुन आला नाही.