तळा बसस्थानक समस्यांचे माहेरघर; एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:25 PM2020-11-11T23:25:04+5:302020-11-11T23:25:11+5:30
अत्यंत दयनीय अवस्था
तळा : तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण असलेले तळा बसस्थानक अनेक सोईसुविधांच्या कमतरतेमुळे समस्यांचे माहेरघर बनले आहे. तळा तालुक्यात एसटी हे दळणवळणाचे एकमेव साधन असून, कोरोनाचा काळ सोडला, तर दिवसभर जवळजवळ ८० ते ८५ एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे तळा बस स्थानकात प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. मात्र, स्थानकात अनेक सोईसुविधांची कमतरता असल्याने, बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.अद्यापही आवारात काँक्रिटीकरण व पाणपोईची व्यवस्था नाही.
२०११च्या दरम्यान ८ लाख रुपये खर्च करून पत्राशेड बांधून तळा येथे बस स्थानक उभारण्यात आले. मात्र, स्थानकातील आवारात अद्यापही काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असून, येणाऱ्या-जाणाऱ्या, तसेच बस स्थानकात बसलेल्या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नूतन बसस्थानक तयार झाल्यापासून आजपर्यंत बस स्थानकात पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. रात्री वस्तीला असलेल्या बस चालक व कंडक्टरलाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने इतरत्र जाऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बस स्थानकात असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पाण्याअभावी बस स्थानक परिसरात दुर्गंधी
बस स्थानकात असलेल्या नळाला गेल्या सहा महिन्यांपासून पाणी येत नसल्याने, येथे असलेल्या शौचालय व मुतारीची दुरवस्था झाली आहे. पाण्याअभावी शौचालय व मुतारीची व्यवस्थितपणे स्वच्छता होत नाही. अस्वच्छतेमुळे काही जण बाहेरच लघुशंका उरकतात. त्यामुळे बस स्थानक परिसरात सातत्याने उग्र वास येत असतो. येथील नागरिक व महिला प्रवाशांना कायम नाकाला रुमाल बांधून ये-जा करावी लागते.