नवी मुंबईत घराच्या किमती महागल्या; NRI सीवूड्समध्ये 2 BHKची ४ कोटींना विक्री
By नारायण जाधव | Published: November 8, 2023 12:52 PM2023-11-08T12:52:42+5:302023-11-08T12:53:19+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर असताना किमती गगनाला भिडल्या
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: येथील रिॲलिटीच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रति चौरस फुटाची किंमत आता ४० हजार रूपये झाली आहे. पाम बीचवरील NRI सीवूड्समध्ये 2 BHK साठी ४ कोटींची रुपये मोजावी लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यतिरिक्त सिडकोचे हस्तांतरण शुल्कदेखील 40 लाख रुपये इतके आहे. यास दुजोरा देताना रियल्टर्स फोरम क्रेडाइ-एमसीएचआय -नवी मुंबईचे वरीष्ठ उपाध्यक्ष मनोहर श्रॉफ म्हणाले की, शहरातील रिअल इस्टेटच्या किंमती आता अमिताभ बच्चन यांच्या शेजारच्या परिसराएवढ्या झाल्या आहेत. श्रॉफ यांच्या म्हणण्यानुसार नेरुळमध्ये पाम बीच मार्गाजवळच्या एका सोसायटीमध्ये सहा-बीएचके ड्युप्लेक्सची 34 कोटींना विक्री झाल्याची माहिती आहे.
“सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी, सर्व ठिकाणी सुरु असलेला संरचनात्मक विकास यासारखे घटक दर्जेदार जीवनशैली देणारी घरे उपलब्ध करुन देत असल्यामुळे रियल्टी किमतींमध्ये वाढ झालेली आहे,” असे ते म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या व्यतिरिक्त शासन देखील एमटीएचएलला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबत जोडण्याच्या प्रयत्नात आहे. “पाम बीच रोड हाय स्ट्रीट रिटेल, करमणूक, दर्जेदार शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांसारख्या सर्वोच्च प्रगत संरचनांनी सज्ज आहे,” अशी माहिती 9 पीबीआर अतिशय आलिशान निवासी प्रकल्पाच्या प्रवक्त्याने दिली. संरचना आणि रियल इस्टेट विकास एकमेकांचे पुरक असतात. वाशी खाडीच्या पुल तसेच ट्रान्स हार्बर रेल लिंक सारख्या प्रकल्पांचा पाया घातला गेल्यावर लगेचच रियल्टीच्या किमतींमध्ये वाढ झालेली आढळून आली असल्याचे, 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नवी मुंबईचे रहिवासी असलेल्या बी. एन. कुमार यांनी सांगितले.
महत्वाच्या संस्थांद्वारे संचालन होणारी महाविद्यालये आणि प्रसिद्ध विद्यापीठे इथे असल्यामुळे हा भाग महाराष्ट्राची उच्च शैक्षणिक राजधानी म्हणून उदयान्वीत होत आहे. त्याचप्रमाणे इथे भव्य मॉल्स, मल्टिप्लेक्सेस तसेच ख्यातनाम ज्वेलरी ब्रॅंड्सची आउटलेट्स सुध्दा दिसतात, असे कुमार म्हणाले. नेरुळमध्ये पाम बीच रोड जवळ असलेल्या भूखंडाची किंमत वाढून जुलै 2021 मध्ये 6.72 लाख रुपये चौरस मीटरवर पोहोचली होती, तर सिडकोची आधारभूत किंमतच आता 1.04 लाख रुपये चौरस मीटर पेक्षा जास्त आहे. घणसोलीच्या एका रहिवासी तसेच व्यावसायिक भूखंडाची विक्री 3 लाख रुपये प्रति चौरस मीटर एवढ्या किमतीला मागच्या वर्षी जूनमध्ये झाली होती.