प्रत्येक जिल्ह्यात माथाडींसाठी गृहप्रकल्प
By admin | Published: September 26, 2016 02:33 AM2016-09-26T02:33:02+5:302016-09-26T02:33:02+5:30
माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविला जाईलच, त्याबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गृहनिर्माण प्रकल्प राबविले जातील
नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविला जाईलच, त्याबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गृहनिर्माण प्रकल्प राबविले जातील. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना घरे मिळवून दिली जातील. माथाडी बोर्डाच्या पुनर्रचनेसह सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये आयोजित केलेला मेळावा अनेक अर्थाने लक्षवेधी ठरला आहे. मुख्यमंत्र्यांनी ४० मिनिटांच्या भाषणामध्ये चार दशकांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देवून कामगारांची मने जिंकली. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात कामगारांचा एकही महत्त्वाचा प्रश्न सुटला नाही. या सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेवून ती सोडविण्याचे आश्वासन दिले. माथाडी कामगार मंडळांची पुनर्रचना करणार. मंडळांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. काही बदमाशांमुळे चळवळ बदनाम होवू लागली असून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असे मतही व्यक्त
केले.
माथाडी कामगारांच्या वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पामधील अडथळे दूर केले जातील. सोलापूरमधील विडी कामगारांच्या धर्तीवर माथाडींसाठी प्रकल्प राबविले जातील. त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करू. प्रस्ताव तयार झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये शासन त्याला मंजुरी देईल. पंतप्रधानांकडून एक महिन्यात मंजुरी मिळवून घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
एपीएमसीच्या बाहेरही कामगारांना संरक्षण देण्यासाठीचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध आहे. माथाडी बोर्ड, नाशिकमधील कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न, कामगारांच्या मुलांना नोकरी देण्याचा प्रश्नही सोडविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समित्या संपविल्या जाण्याचे चुकीचे आरोप सरकारवर केले जात आहेत. परंतु आम्ही बाजार समित्या अधिक सक्षम करण्यावर लक्ष देत आहोत. कामगार व शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही माथाडी बोर्डावर पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची व समितीवर माथाडींचे दोन सदस्य घेणार असल्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठीच्या सूचना आम्हाला केल्या असून त्या दिशेने पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी राज्यात माथाडी ही कामगारांची एकमेव चळवळ शिल्लक आहे. गिरणी कामगारांप्रमाणे त्यांची स्थिती होणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्यामध्ये काही अडचणी आहेत. लवकरच याविषयीचे धोरण निश्चित होईल. माथाडी कामगारांनी गरजेपोटी बांधलेली घरेही नियमित केली जातील. सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेली घरे नियमित केली जातील. परंतु अनधिकृत इमले बांधणाऱ्या बिल्डरांना सरकार कधीच अभय देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पृथ्वीराज चव्हाणांवर टीकेची झोड
आघाडी सरकारच्या काळात काँगे्रस व राष्ट्रवादीच्या भांडणात माथाडी कामगारांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कामगारांचा एकही प्रश्न सोडविला नाही. आम्ही पंधरा वर्षे कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी संघर्ष केला व प्रत्यक्षात वाटप करत असताना ज्यांच्या मागे कामगार नाही त्यांना अर्धा वाटा देण्यात आला. त्यांच्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याची थेट टीकाही नरेंद्र पाटील यांनी केली.
अतिक्रमणांना अधिकारी जबाबदार
नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार व प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे नियमित करण्याची मागणी केली. जेव्हा या घरांचे बांधकाम सुरू असते तेव्हा अधिकारी येवून टेबलाखालून लाच घेतात व बांधकाम होवू देतात. बांधकाम केल्यानंतर मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी आले की बांधकामे पाडतात हे प्रकार थांबविण्याची मागणी केली.
राजकारण करणार नाही
कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना कोणतेही राजकारण केले जाणार नाही. सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. किती वर्षे मुख्यमंत्री रााहिले यापेक्षा काय काम केले याला महत्त्व देत आहे. पक्षाची कालिकत येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग असतानाही कामगार चळवळीसाठी मेळाव्यास आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माथाडींसाठी भांडीही घासेन
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार हेच माझे सर्वस्व असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरातील भांडी घासण्याचीही तयारी असल्याचे स्पष्ट केले. चळवळीला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांनी सदैव आधार दिला. मुख्यमंत्र्यांनी आमचे प्रश्न सोडविल्यास कामगार त्यांनाही विसरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.