शहरात गृहविलगीकरणामुळे रुग्णालयांवर भार झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:47 PM2020-11-18T23:47:26+5:302020-11-18T23:47:34+5:30
१५,०५१ रुग्णांनी घेतला लाभ : कोरोनाची भीती कमी करण्यास मदत
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयांमधील बेडची क्षमता वाढविण्याबरोबर गृहविलगीकरणासही प्राधान्य दिले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना व घरामध्ये नियमांचे पालन करणे शक्य असणाऱ्यांवर घरातच उपचार केले जात आहेत.
आतापर्यंत १५,०५१ जणांवर घरातच उपचार करण्यात आले असून, सद्य:स्थितीमध्ये ३१३ जण घरी उपचार घेत आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ब्रेक द चेन, शून्य मृत्युदर, मास्क नाही तर प्रवेश नाही व इतर अभियान राबविण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी मनपाने जम्बो रुग्णालये उभारली व खासगी रुग्णालयांमध्येही उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. याचबरोबर गृहविलगीकरणासही प्राधान्य देण्यात आले. ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत व ज्यांच्यामध्ये सहव्याधी नाही. ज्यांच्या घरामध्ये स्वतंत्र खोली आहे, देखभाल करण्यासाठी दुसरी व्यक्ती आहे अशांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी झाला व घरात उपचार घेऊनही कोरोनामुक्त होता येते याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.
सुरुवातीला कोरोना झालेल्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनाही चुकीची वागणूक मिळत असल्याचे देशभर अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. नवी मुंबईमध्ये असे होणार नाही याकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले होते. शासन नियमावलीचे पालन करून घरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. आतापर्यंत तब्बल ३२ टक्के रुग्णांना या योजनेचा लाभ झाला आहे. १५ हजार ५१ रुग्ण घरामध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामध्ये ८,५४७ पुरुष व ६,५०३ महिला व एका तृतीयपंथी नागरिकाचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये १२० महिला व १९३ पुरुष घरी उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणामुळे रुग्णालयांवरील व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करणेही शक्य झाले. याशिवाय घरामध्ये पुरेशी जागा असेल तर घरामध्ये उपचार घेऊन बरे होता येते हेही यामुळे नागरिकांच्या लक्षात आले. कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला.
सौम्य लक्षणे व सहव्याधी नसलेल्या कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. जे रुग्ण घरामध्ये उपचार घेतात त्यांच्यावर महानगरपालिका प्रशासन विशेष लक्ष देत आहे. आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रतिदिन या रुग्णांना फोन करून त्यांची चौकशी करण्यात येते.