पनवेल : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार सोहळ्याचे १३ सप्टेंबरला पनवेलमधील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षक समाज घडविण्याचे काम करत असतात. विद्यार्थ्यांवर संस्कार करून देशहितासाठी सकारात्मक कार्य करणारी पिढी तयार करत असतात. वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ‘लोकमत’च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी आशिमिक कामठे प्रस्तुत वारसा माझ्या कलेचा हा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.
या कार्यक्र माला लागीर झालं जी कार्यक्रमातील भय्यासाहेब यांची भूमिका केलेले कलाकार अभिनेता किरण गायकवाड उपस्थित राहणार आहेत. यासह माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, प्रोग्रेसिव्ह गु्रपचे चेअरमन विनोद त्रिवेदी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, यांच्यासह श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.