नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातील १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले आहे. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी या सर्वांना त्या सन्मानाने पुरस्कृत केले जाणार आहे. त्यात दोन पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक निरीक्षक, तीन सहाय्यक उपनिरीक्षक दहा हवालदारांचा समावेश आहे.घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासात दाखवलेले कौशल्य, गुणवत्तापूर्ण सेवा, सराईत गुन्हेगारांवर केलेल्या कारवाया, प्रशंसनीय कामगिरी तसेच १५ वर्षांच्या सेवेत उत्तम सेवाभिलेख असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिवर्षी महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून गौरविले जाते. त्यानुसार यंदाच्या पुरस्काराची यादी महासंचालक कार्यालयाकडून बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयातील १६ जणांचा समावेश आहे. पोलीस ठाणे, राज्य गुप्तवार्ता तसेच राज्य राखीव बल याठिकाणी कार्यरत असणारे हे अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यात दोन पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, भीमराव बिनवडे, सहाय्यक निरीक्षकांमध्ये मारुती नाईकडे, सहाय्यक उपनिरीक्षक मनोज वायंगणकर, काशिनाथ राऊत, पांडुरंग निघोट, हवालदार विनोद नवले, संजय कदम, विकास साळवी, जितेंद्र गोसावी, सुदाम पाटील, विजय निवळे, राजेश शिर्के, समीर पाटील, जगदीश पाटील, विनायक निकम यांचा समावेश आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या सर्वांना कळंबोली येथील पोलीस मुख्यालय आवारात अथवा मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
शहरातील १६ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By admin | Published: April 27, 2017 12:12 AM