ड्राय वेस्ट बँक उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान
By योगेश पिंगळे | Published: February 23, 2024 05:18 PM2024-02-23T17:18:12+5:302024-02-23T17:18:35+5:30
शिक्षकांकडे उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता पासबुक देण्यात आलेले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पॉइंट्सची नोंद केली जाते.
नवी मुंबई : ड्राय वेस्ट बँक या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी आपल्या घरातून टेट्रापॅक, बॉटल, चॉकलेट व गोळ्यांचे रॅपर, सॅशे, इत्यादी कचरा सुक्या कचऱ्यात न टाकता शाळेत घेऊन येतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात त्यांना पॉइंट्स देण्यात येतात व सर्वाधिक पॉइंट्स जमविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात शालेय साहित्य देण्यात येते.
शिक्षकांकडे उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता पासबुक देण्यात आलेले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पॉइंट्सची नोंद केली जाते. या उपक्रमात हजारो विद्यार्थी सहभागी झाले असून, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना सीबीडीतील वारकरी भवन येथील विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
स्वच्छतेचा मंत्र आपल्या कृतीतून पटवून देणाऱ्या व कीर्तनासारख्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व रुजविणाऱ्या संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून आज घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या माध्यमातून ‘ड्राय वेस्ट बँक’ या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सद्य:स्थितीत बेलापूर, नेरूळ, वाशी या तीन विभागांतील १५ शाळांमध्ये राबविला जाणारा हा उपक्रम महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्वच शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या १५ शाळांमधील २७७१ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी असून, यामधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये झालेल्या ड्राय वेस्ट बँक उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उत्तम कामगिरी करून पारितोषिकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत या उपक्रमातील आपले चांगले काम इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. सदर उपक्रमातील पारितोषिक स्वरूपात वितरण केलेले शैक्षणिक साहित्य सूर्योदय फायनान्स बँक यांच्या सीएसआर निधीमधून उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी उपायुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जयंत जावडेकर, बेलापूरचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल आणि बँकेचे व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.