कोपरखैरणेत फेरीवाल्यांची गुंडगिरी
By admin | Published: April 20, 2017 03:36 AM2017-04-20T03:36:59+5:302017-04-20T03:36:59+5:30
कोपरखैरणे सेक्टर १५ मधील अनधिकृत फेरीवाल्यांनी बुधवारी रात्री अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारासह तिघांना बेदम मारहाण केली
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १५ मधील अनधिकृत फेरीवाल्यांनी बुधवारी रात्री अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारासह तिघांना बेदम मारहाण केली. या घटनेचा या परिसरातील दुकानदारांनी निषेध केला असून दुकाने बंद केली आहेत. गुरूवारीही मुख्य बाजारपेठ बंद करून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जाणार आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न कोपरखैरणे परिसरात ऐरणीवर आला आहे. सेक्टर १५ व १८ च्या मधील रोडवर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. रोज सायंकाळी व रविवारी येथून वाहने जावू शकत नाहीत. पायी ये - जा करण्यासही नागरिकांना त्रास होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविषयी वारंवार तक्रारी करून व प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतरही पालिका प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली होती, पण कोपरखैरणेमधील या परिसरातील फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यात त्यांनाही अपयश आले होते. बुधवारी अनधिकृत फेरीवाल्यांनी रूपाली मॅचिंग सेंटर या कपडे विक्रीच्या दुकानाचे मालक बजरंग मोरे व त्यांचा मुलगा प्रविध मोरे याला मारहाण केली. प्रथम दोघांनी व नंतर पाच ते सहा जणांच्या जमावाने त्यांना मारहाण केली. यावेळी परिसरातील शिंदे नावाची व्यक्ती मध्यस्थी करण्यासाठी आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तिघांच्याही चेहऱ्यावर डोळ्याजवळ नखांनी ओरबाडण्यात आले आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
फेरीवाल्यांच्या मनमानीमुळे आतापर्यंत नागरिक व व्यावसायिक त्रस्त होते. आता चक्क गुंडगिरी सुरू झाल्याने त्यांच्याविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांनी तत्काळ एकत्र येवून या घटनेचा निषेध केला आहे. अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देवून सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. गुरूवारीही या घटनेच्या निषेधार्थ कोपरखैरणे सेक्टर १५, १८ मधील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.