नवी मुंबई : ऐरोली येथील कोळी आगरी महोत्सवाची सांगता प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात झाली. महोत्सवाच्या अंतिम दिनी उपस्थित हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. महोत्सवादरम्यान प्रकल्पग्रस्तांचे नेते श्याम म्हात्रे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान आयोजित कोळी आगरी महोत्सवाची सांगता रविवारी प्रेक्षकांच्या अलोट गर्दीने झाली. या महोत्सवाच्या माध्यमातून ऐरोली कोळीवाडा येथे पाच दिवस विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू होता. आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवत नृत्य स्पर्धा, लोकगीते, कोळीगीते अशा अनेक कार्यक्रमांचा आनंद नागरिकांनी घेतला. प्रतिष्ठानचे आयोजक अॅड. रेवेंद्र पाटील यांनी चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सांगता रविवारी मोठ्या उत्साहात झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्याम म्हात्रे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. सेंट अँजेलोस इन्स्टिट्यूटचे प्रमुख राजेश अर्थडे यांच्या हस्ते उपआयुक्त सुरेश मेंगडे, निवृत्त सहाय्यक आयुक्त वसंत ढोबळे यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कोळी आगरी समाजाने एकत्र होवून प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातला लढा बळकट करण्याची गरज श्याम म्हात्रे यांनी व्यक्त केली. महोत्सवाच्या सांगता प्रसंगी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते अनंत तरे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शवली.महोत्सवात प्रेक्षकांना हसवून सोडण्यासाठी ‘चला हवा येवू द्या’चे कलाकार उपस्थित झाले होते. त्यानुसार भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या कलाकारांनी प्रेक्षकांना बसल्या जागी हास्याने खिळवून ठेवले. त्यांची ही अदाकारी पाहण्यासाठी लहान मुलांसह महिला व पुरुष प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी बालकलाकारांनी देखील अंगीकृत कला सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. (प्रतिनिधी)
कोळी आगरी महोत्सवात हास्यकल्लोळ
By admin | Published: February 03, 2016 2:23 AM