भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या दोघांना उडवलं; तळोडा एमआयडीसीत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:33 IST2025-01-14T16:17:15+5:302025-01-14T16:33:33+5:30
नवी मुंबईच्या तळोजा भागात झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या दोघांना उडवलं; तळोडा एमआयडीसीत एकाचा मृत्यू
Taloja MIDC accident:नवी मुंबईतअपघाताची मालिका थांबवण्याची नाव घेत नाहीये. पाम बीच रोडवर स्कोडा कारने दिलेल्या धडकेत स्कूटीवरील दोन तरुणींचा सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी नवी मुंबईत बेफाम कारचालकाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दोन जणांचा उडवलं आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात हा भीषण अपघात झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. एमआयडीसीतील शिवजागृती हॉटेलसमोर हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती गंभीर जखमी असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
पोलीस अपघात झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांना वाहनाच्या नंबरची माहिती मिळाली असून ते लवकरच चालकाला ताब्यात घेणार आहेत. वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अपघातातील महिला गंभीर जखमी झाली असून तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी स्कूटीवरुन जाणाऱ्या दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाला. कॉल सेंटरमधील कामावरून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला स्कोडा कारने धडक दिली. यात एक तरुणी जागीच ठार झाली तर दुसरीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संस्कृती खोकले (वय २२) व अंजली पांडे (वय १९) अशी मृत तरुणींची नावे आहेत. अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती स्कूटीवरुन येत होती. त्यावेळी वीरशैव स्मशान भूमीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव स्कोडा कारने त्यांना धडक दिली.
त्यानंतर मदत करण्याऐवजी स्कोडा चालकाने गाडीसह तिथून पळ काढला. या अपघातात संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला तर अंजलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचाही उपचारादरम्यान, मृत्यू झाला. दरम्यान, नवी मुंबईत नवीन वर्ष सुरु झाल्यापासून गेल्या १४ दिवसांत झालेल्या विविध अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.