घणसोलीमधील मटका अड्ड्यांवर धाड
By admin | Published: October 16, 2015 02:30 AM2015-10-16T02:30:09+5:302015-10-16T02:30:09+5:30
घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण १७ जणांना अटक केली आहे
नवी मुंबई : घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण १७ जणांना अटक केली आहे. संबंधितांकडून ३५ हजार व साहित्यही जप्त केले आहे.
शहरातील सर्व जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शहरात वर्षानुवर्ष सुरू असलेले सर्व अड्डे बंद केले आहेत. मनोरंजन क्लबच्या नावाने सुरू असलेले अड्डेही बंद झाले आहेत. अवैध व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले असून त्यांनी गणेश उत्सव मंडळांचा आधार घेण्यास सुरुवात केली होती. परंतु गणेश मंडळावरील सहा अड्यांवर धाड टाकल्यामुळे अवैध व्यवसाय करणारांमध्ये पोलिसांविषयी दरारा निर्माण झाला आहे. पोलिसांचा ससेमीरा सोडविण्यासाठी घर भाड्याने घेवून तेथे जुगार खेळण्यास सुरवात झाली आहे. घणसोलीतील एकता अंकिता बिल्डींगसमोर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरूवारी दुपारी धाड टाकली. पोलिसांनी मटका अड्डा चालविणाऱ्या गणेश भोईर, अनंत हांडोरे, मोतीलाल राठोड, दिगंबर गावंड यांच्यासह मटका खेळणाऱ्या १३ जणांना अटक केली आहे. ३५ हजार रूपये जप्त केले आहे. या कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांच्यासह १० जणांनी सहभाग घेतला होता.