लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नवीन पनवेल सेक्टर १ येथील नील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने येथील वातावरण तणावाचे झाले होते. त्यामुळे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पनवेल तालुक्यातील खानाव गावातील तुकाराम नामदेव तवळे यांना ५ ते ६ दिवसांपूर्वी ताप आल्याने नील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने रु ग्णाला दुसरीकडे घेऊन जातो, असे नातेवाईकांनी सांगितले. मात्र डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईक सूर्यकांत मराठे यांनी केला. रु ग्णाचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.खानाव येथील तुकाराम नामदेव तवळे(५५) यांचा मृत्यू झाल्याचे समजताच गावातील मंडळी व शेकडो नातेवाईक रुग्णालयात जमा झाले. यावेळी त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी माजी आमदार विवेक पाटील, भाजपाचे अरुण भगत, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे जयराज छापरिया, सुनील बाजारे, वसंत सप्रे आदींनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळताच डॉक्टर पसार झाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. त्यामुळे आधी डॉक्टरला हजर करा, जोपर्यंत डॉक्टर रुग्णालयात येणार नाहीत तोपर्यंत शव उचलणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. रु ग्णाच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगत रु ग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. माजी आमदार विवेक पाटील व पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पनवेलमध्ये रुग्णालयाची तोडफोड
By admin | Published: May 15, 2017 12:47 AM