पालिका रुग्णालयात हातमोजेही नाहीत; जखमी वृद्धास मेडिकलच्या रांगेत उभे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:10 AM2018-03-22T03:10:47+5:302018-03-22T03:10:47+5:30

महापालिका रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जखमी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचा-यांकडे हातमोजेही नसल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.

 The hospital does not have gloves; The injured old man is standing in a medical queue | पालिका रुग्णालयात हातमोजेही नाहीत; जखमी वृद्धास मेडिकलच्या रांगेत उभे केले

पालिका रुग्णालयात हातमोजेही नाहीत; जखमी वृद्धास मेडिकलच्या रांगेत उभे केले

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महापालिका रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जखमी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचा-यांकडे हातमोजेही नसल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. जखमी वृद्धालाही उपचारापूर्वी हातमोजे खरेदी करण्यासाठी मेडिकलच्या रांगेत उभे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रुग्णालय प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्ये सातत्याने आरोग्य विभागाचे वाभाडे निघत आहे. स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी रुग्णालयामध्ये औषधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. रुग्णांना खाजगी मेडिकलमधून औषधे घेवून येण्यासाठी दिलेली चिठ्ठीही सभागृहात दाखविली होती, परंतु यानंतरही औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये डॉक्टर व इतर कर्मचाºयांकडे हातमोजेही नाहीत. मंगळवारी ८० वर्षांचे वृद्ध प्रसाद जैसवाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ते उपचारासाठी वाशी रुग्णालयात गेले होते. त्यांना डॉक्टरांनी मेडिकलमधून हातमोजे विकत आणण्यास सांगितले. वृद्ध नागरिकाचा पाय व पादत्राणेही रक्ताने भरली होती. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणाने वृद्धाला प्रसाधनगृहात नेवून त्याचा पाय व पादत्राणे धुवून दिली व पुन्हा उपचारासाठी रांगेत उभे केले. मेडिकलमधून हातमोजे आणल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. इंदिरानगरमध्ये राहणाºया सुनील स्वामी या तरुणाचा दोन दिवसापूर्वी मानखुर्दमध्ये अपघात झाला होता. उपचारासाठी तो सोमवारी रुग्णालयात गेला होता. रुग्णालय व्यवस्थापनाने त्यालाही औषधांची चिठ्ठी दिली. मेडिकलमध्ये गेल्यानंतर ती औषधे नसून हातमोजे असल्याचे निदर्शनास आले. १८ रुपये खर्च करून हातमोजे आणल्यानंतरच त्याच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयामध्ये हातमोजेही नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इंदिरानगर परिसरामध्ये राहणारा विकास घाबाळे हा पाचवीत शिकत असलेला मुलगा २० फेब्रुवारीला शिडीवरून पडला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला उपचारासाठी आणल्यानंतर आजीकडून त्याचे नाव विकासऐवजी आकाश सांगण्यात आले. चार दिवसांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजीने नाव दुरुस्त करण्याची विनंती डॉक्टरांना केली. परंतु ही अपघाताची घटना आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलिसांकडून लिहून आणा असे सांगण्यात आले. चार दिवस अधिकाºयांना विनंती केल्यानंतरही प्रशासनाने दाद दिली नाही. याविषयी माहिती मिळताच शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी डॉक्टरांची भेट घेतली. क्षुल्लक कारणांसाठी गरीब रुग्णांना त्रास दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर नावात दुरुस्ती करून देण्यात आली. अशाप्रकारे रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या लुबाडणूक व अडवणुकीविषयी माहिती घेण्यासाठी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही.

कधी होणार सुधारणा?
महापालिकेच्या आरोग्य विभागाविषयी महासभा व स्थायी समितीमध्ये सातत्याने टीका होवू लागली आहे. नागरिकांनीही अनेक तक्रारी केल्या आहेत. औषधांचा तुटवडा असल्याचे स्थायी समिती सभापतींनीही निदर्शनास आणून दिले होते. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून आरोग्य विभागाच्या कामकाजामध्ये नक्की कधी सुधारणा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अपघात झाल्यामुळे उपचारासाठी मनपा रुग्णालयामध्ये गेलो होतो. डॉक्टरांनी मेडिकलमधून हातमोजे विकत आणायला लावले, त्यानंतर उपचार सुरू केले. जखमी वृद्धासही हातमोजे विकत आणायला लावले.
- सुनील स्वामी,
जखमी तरुण

इंदिरानगरमधील मुलगा शिडीवरून पडल्याने रुग्णालयात दाखल केले होते. नावात बदल करण्यासाठी पोलिसांचा दाखला आणण्यास भाग पाडले जात होते. रुग्णांची अशाप्रकारे होणारी अडवणूक थांबली पाहिजे यासाठी पालकमंत्री व खासदारांकडेही तक्रार करणार आहोत.
- महेश कोठीवाले,
शाखा प्रमुख शिवसेना

Web Title:  The hospital does not have gloves; The injured old man is standing in a medical queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.