ठाणे : रेल्वेत चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या बालगुन्हेगारास वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. तपासणी सुरू असताना रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पळ काढल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला काही तासांनी भार्इंदर येथून रेल्वे पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.भार्इंदर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ३ फेब्रुवारी रोजी रेल्वेत चोरी केल्याप्रकरणी मीरा रोड येथील पंधरावर्षीय मुलाला अटक करून त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली होती. न्यायालयाने वयाच्या पुराव्यासाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीचे निर्देश रेल्वे पोलिसांना दिले. त्यानुसार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरपीएफ उपनिरीक्षक ब्रिजमोहन सिंग आणि आरपीएफ हवालदार अमरनाथ पांडे यांनी जिल्हा रु ग्णालयात तपासणीसाठी आणले. एक्सरे काढण्यासाठी नेले असता एक्सरे कक्षाच्या खिडकीतून त्याने संधी साधून पलायन केले.
रुग्णालयातून बालगुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:30 AM