कोरोनाचे कारण सांगून हॉस्पिटलने प्रवेश नाकारला; हार्ट अटॅक आलेल्या वकिलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:32 PM2020-04-20T15:32:44+5:302020-04-20T15:33:49+5:30
प्रथम पत्नी आणि मुलाने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेले असता तेथे देखील गेटवरील सिक्युरिटी गार्डने गेट खोलण्यास मनाई केली.
नवी मुंबई - देशभरात कोरोनाने हायपाय पसरले असून खाजगी डॉक्टरांचे दवाखाने देखील अनेक ठिकाणी बंद आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्याने काही रुग्णालये देखील सील करण्यात आली आहेत. नवी मुंबईत रुग्णालयाने प्रवेश नाकारल्याने आणि हार्ट अटॅक आल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने ५६ वर्षीय वकिलाचामृत्यू झाला आहे. वाशीमधील सेक्टर 17 मध्ये मोहन ब्रिजमध्ये राहणारे जयदीप जयवंत असे या वकिलाचे नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते वकिली करत होते.
14 एप्रिलला दुपारचे जेवण घेतल्यानंतर वकील जयदीप जयवंत यांना दुपारी 2.15 च्या सुमारास हार्ट अटॅक आला. त्यावेळी तात्काळ त्यांची पत्नी दीपाली यांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना घेऊन रुग्णालयामध्ये गेली. अर्ध्या ते एक तासात जयदीप यांचा उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला.
प्रथम पत्नी आणि मुलाने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेले असता तेथे देखील गेटवरील सिक्युरिटी गार्डने गेट खोलण्यास मनाई केली. तसेच रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित असल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यानंतर ३. ३० वाजताच्या सुमारास नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर उशीर झाला होता. दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी अशा प्रकारे तातडीच्या सेवेसाठी रुग्णांना प्रवेश नाकारणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.