नवी मुंबई : खासगी रुग्णालयांकडून होणाºया लुबाडणुकीविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल महानगरपालिकेने घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक थांबविण्यासाठी ‘कोविड १९ - बिल तक्रार निवारण केंद्र’ सुरू केले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत हे केंद्र सुरू राहणार असून, आलेल्या तक्रारीवर २४ तासांत कार्यवाही केली जाणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना व इतर आजार झालेल्या नागरिकांची खासगी रुग्णालयांकडून लुबाडणूक केली जात असल्याचे लोकमतने ‘रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले होते. ‘लोकमत’च्या भूमिकेचे शहरवासीयांनीही स्वागत केले होते.
अनेक सामाजिक संघटना व राजकीय प्रतिनिधींनीही महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही मनपा आयुक्तांची भेट घेऊन लुबाडणूक करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महानगरपालिकेने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘कोविड १९ - बिल तक्रार निवारण केंद्र’ सुरू केले आहे.
सकाळी ८ पासून १२ तास हे केंद्र सुरू राहणार आहे. नागरिकांनी २७५६७३८९ या संपर्क क्रमांकावर बिलाविषयी तक्रार करावी किंवा ७२०८४९००१० या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. खासगी रुग्णालयांनी किती बिल घ्यावे याविषयी त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा
च्तक्रार करताना नागरिकांनी रुग्णाचे नाव, तक्रारदाराचे नाव, मोबाइल संपर्क नंबर, रुग्णाचा पत्ता, रुग्णालयाचे नाव, रुग्णालयात दाखल दिनांक, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचा दिनांक, बिलाची रक्कम तसेच तक्रारीची संक्षिप्त माहिती द्यावी. संपर्क क्रमांक व व्हॉट्सअॅप तक्रार करता येणार आहे.
च्नागरिकांनी तक्रार केल्यानंतर २४ तासांत त्यावर उचित कार्यवाही केली जाणार आहे. तक्रारदारांना टोकन नंबर देण्यात येणार असून, तक्रारीवर काय कार्यवाही केली याविषयी माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांनी किती बिल घ्यावे याविषयी त्यांना मार्गदर्शक सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.