- नामदेव मोरेनवी मुंबई - महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे यंत्रणा कोलमडली आहे. ३५० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त १७० रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागात एकच रुग्ण असून नवीन प्रवेश थांबविण्यात आले आहेत. शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत असून नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली व नेरूळमधील नवीन रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. सीबीडीमधील माता बाल रुग्णालयाचीही स्थिती तशीच असून तुर्भे व कोपरखैरणे माता बाल रुग्णालयही बंद आहे. यामुळे शहरवासीयांना उपचारासाठी पूर्णपणे वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु काही दिवसांपासून याठिकाणीही डॉक्टरांची कमतरता जाणवू लागली आहे. रुग्णालयात जवळपास ८ वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात एकच डॉक्टर उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये १५बेड उपलब्ध आहेत. पण येथे फक्त एकच रुग्ण उपचार घेत आहे.डॉक्टर नसल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. आलेल्या रुग्णांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पाठवावे लागत आहे. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेड व महिला विभागामध्ये २५ बेड आहेत. परंतु हे दोन्ही विभाग डॉक्टर नसल्यामुळे पूर्णपणे खाली आहेत. पालिका रुग्णालयामधील बाह्य रुग्ण विभागामध्ये ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. सद्यस्थितीमध्ये ही संख्या सरासरी ४०० रुग्ण एवढी झाली आहे. महापालिका रुग्णालयामध्ये ३५० बेडची क्षमता आहे. रुग्णांची संख्या अनेक वेळा यापेक्षा जास्त रुग्ण दाखल करण्यात येत होते. पण डॉक्टरांची कमतरता व इतर गैरसोयींमुळे आता १७० रुग्णच दाखल करण्यात आले आहेत.नवी मुंबईकरांसाठी एकमेव आधार असलेल्या प्रथम संदर्भ रुग्णालयाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पण महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्र काढून रुग्णालय सेवा पूर्ववत सक्षमतेने कार्यान्वित झाल्या असल्याचेही स्पष्ट केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवा पुरविण्यात येणारी अडचण दूर करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालय पूर्ववत सुरू केले असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयाचे कामकाज अद्याप पूर्ववत झालेले नाही. लवकरात लवकर नवीन वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची नियुक्ती झाली नाही तर अतिदक्षता विभागाप्रमाणे इतर विभागामधील रुग्णांवरही योग्य उपचार करता येणार नाहीत अशी स्थिती आहे. डॉक्टर नसल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये रुग्णांना भरती करून घेतले नाही किंवा रुग्णांवर योग्य उपचार झाले नाहीत तर नातेवाईकांच्या भावनांचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिकांनी व्यक्त केली नाराजीनवी मुंबई महानगरपालिकेचे एकही रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू नाही. दोन माता बाल रुग्णालयेबंद आहेत. ऐरोली, नेरूळ व बेलापूर रुग्णालयही डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे पूर्ण क्षमतेने चालविता येत नाही. एकमेव पर्याय असलेल्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील समस्याही वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. स्मार्ट सिटी व देशातील स्वच्छ शहर असल्याचा दावा करणाºया नवी मुंबईतील रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जावे लागत असल्याची खंतही शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी एक व सोमवारी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. पुढील दोन दिवसामध्ये नवीन डॉक्टर रुग्णालयाच्या सेवेत दाखल होतील. यानंतर सर्व कामकाज सुरळीत होणार आहे.- महावीर पेंढारी,अतिरिक्त आयुक्त, महापालिका
पालिका रुग्णालयातील यंत्रणा कोलमडली, डॉक्टरांची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:46 AM