पनवेल : पर्यटन विकास महामंडळाने सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून खारघर येथे उभारलेले वसतिगृह वापराविना धूळखात पडून आहे. ९ कोटी रु पये खर्च करून खारघरमध्ये उभारलेल्या युथ हॉस्टेलच्या नावाने उभारलेल्या या वसतिगृहाचे काम जानेवारी २0१८ मध्ये पूर्ण झाले. परंतु ते सुरू करण्याबाबत पर्यटन महामंडळाला अद्यापि मुहूर्त सापडत नसल्याने वास्तू धूळखात पडून आहे.पर्यटन विकास महामंडळाने राज्यात अनेक ठिकाणी पर्यटक निवास, हॉटेल व उपाहारगृहे उभारली आहेत. नवी मुंबई, पनवेल परिसरात एकही वसतिगृह नाही. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि निसर्गसौंदर्य, धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणे, वन्य पशू-पक्ष्यांची अभयारण्ये असलेल्या रायगड जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण म्हणून ओळखला जातो. मुंबई, नवी मुंबईत पर्यटकांना मध्यवर्ती ठिकाणी अल्प दरात निवासाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने खारघर सेक्टर १२ येथे वसतिगृहाची चार मजली इमारत बांधली आहे. यात शंभर खोल्या, कॉन्फरन्स हॉल, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, ग्रंथालय, वाचनालय आदींची सुविधा आहे. विशेष म्हणजे हे वसतिगृह जानेवारी महिन्यात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार होते. त्यानुसार महामंडळाने डिसेंबरमध्येच वसतिगृहाच्या आतील कामे पूर्ण करण्यात आली होती. परंतु पाच महिने झाले तरी हे वसतिगृह सुरू न केल्याने पर्यटकांत विशेषत: खारघरमधील रहिवाशांत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, खारघर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांच्या दबावामुळे पर्यटन महामंडळ हे वसतिगृह सुरू करण्यास धजावत नसल्याची चर्चा सुरू आहे.
खारघरमधील वसतिगृह धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:40 AM