उन्हेरेतील गरम पाण्याची कुंड समस्यांच्या गर्तेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:37 AM2019-10-24T01:37:32+5:302019-10-24T06:10:00+5:30
सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची सुधागड तालुक्याकडे पाठ
- विनोद भोईर
पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंड प्रसिद्ध आहेत; परंतु सोयी-सुविधांअभावी पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली आहे. येथील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. शासकीय विश्रामगृहदेखील बंद आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तसेच पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी संबंधित प्रशासन कानाडोळा करीत आहे.
रायगड जिल्ह्यात महाड येथील सर्व आणि सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथे गरम पाण्याची कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची अधिक पसंती आहे. या कुंडातील पाणी अंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे; परंतु कुंडाजवळ असलेले रायगड जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह बंद आहे. १९९३-९४ रोजी बांधलेल्या विश्रामगृहाची काही वर्षांपूर्वी दुरुस्ती होऊनही सद्यस्थितीत ते बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. विश्रामगृहाच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांना येथे राहता येत नाही, त्यांची गैरसोय होते.
विश्रामगृहाच्या शेजारीच निर्मल भारत अभियानांतर्गत दोन लाख रुपये खर्चून फेब्रुवारी २०१४ मध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत; परंतु या स्वच्छतागृहात सध्या घाणीचे साम्राज्य आहे. दरवाजे तुटले आहेत. देखभाल नसल्याने स्वच्छतागृह वापरण्यास योग्य नाही. स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या चेंजिंग रूमचीही पडझड झाली आहे. परिणामी, पर्यटकांची गैरसोय होते.
उन्हेर कुंड परिसरात असलेल्या विठ्ठल रखमाई मंदिरासमोरील सभामंडपाचे काम कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहे. या सभागृहाचा काही भाग खासगी जागेत असल्यामुळे काम रखडल्याचे स्थानिक सांगतात. तर डीपीडीसीच्या माध्यमातून फंड आल्यास सभागृहाचे काम पूर्ण होऊ शकते, असे जानकारांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील गरम पाण्याच्या उन्हेर कुंड परिसरात योग्य सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल. त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उन्हेरे गरम पाण्याचे कुंड
पालीपासून अडीच ते तीन कि.मी. अंतरावर उन्हेरे गरम पाण्याची कुंड आहेत. उन्हेर कुंडावर एकूण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याची आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर असून आकाराने लहान आहेत. तर दुसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी या कुंडाच्या भोवती टाइल्स लावून रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील चेंजिंग रूमची दुरवस्था झाल्याने सध्या बंदावस्थेत आहे. शिवाय परिसरात अस्वच्छता पसरली आहे.