नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका, ग्राहकांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 03:45 AM2020-03-19T03:45:02+5:302020-03-19T03:45:24+5:30
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत
नवी मुंबई : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी जमण्याच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच खबरदारीचा उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनीही स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे नेहमीची वर्दळीची असणारी ठिकाणेही ओस पडली आहेत.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत; परंतु त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामध्ये उद्याने, हॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहे यांचा समावेश आहे. त्याशिवाय सार्वजनिक सभा व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा वावर झाल्यास अनेकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, तर त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे हॉटेल व बारही ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवले जावेत, अशी मागणी होत आहे; परंतु प्रशासनाने जरी त्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नसला, तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी मात्र स्वेच्छेने व्यवसाय बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना रोजचा १० ते ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर जे हॉटेल अद्यापही सुरू ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी नागरिकच जायचे टाळत आहेत, यामुळे नेहमी ग्राहकांची वर्दळ असणारी हॉटेल मागील दोन दिवसांपासून ओस पडली आहेत; परंतु हॉटेल व बार यामध्ये जमणाऱ्या गर्दीच्या बाबतीत प्रशासनाने अद्याप गांभीर्य घेतले नसल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. परिणामी, शहरातील सर्व्हिसबार व बेकायदेशीरपणो चालणारे डान्सबार अद्यापही रात्री उशिरापर्यंत चालवले जात आहेत.
हॉटेलचालक संघटनेच्या निर्णयाकडे लक्ष
हॉटेलमध्ये ग्राहकांच्या स्वरूपात जमणारी गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. यानंतरही इतर आस्थापने व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणाºया प्रशासनांना हॉटेल व बारचा विसर पडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने हॉटेल्स बंद ठेवली आहेत. हॉटेलचालक संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षेसाठी हॉटेल बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे रोजचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे; परंतु स्वत:च्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर हॉटेल व्यावसायिकांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे आहे.
- संदीप पाटील, हॉटेल व्यावसायिक, कोपरखैरणे.