हॉटेलचालकांनी पालिकेचे नियम तोडले

By Admin | Published: November 30, 2015 02:16 AM2015-11-30T02:16:12+5:302015-11-30T02:16:12+5:30

शहरातील बहुतांश हॉटेलचालकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. चार महिन्यांसाठी परवानगी असलेल्या पावसाळी शेड अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत.

Hotel operators broke the rules of the corporation | हॉटेलचालकांनी पालिकेचे नियम तोडले

हॉटेलचालकांनी पालिकेचे नियम तोडले

googlenewsNext

नवी मुंबई : शहरातील बहुतांश हॉटेलचालकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. चार महिन्यांसाठी परवानगी असलेल्या पावसाळी शेड अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. पालिकेच्या नोटिसांकडेही व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले असून, शेडचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे.
पावसाचे पाणी हॉटेलमध्ये येऊन ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी व्यावसायिकांना पावसाळ्यातील चार महिने दुकानाबाहेर शेड टाकण्यास महापालिका परवानगी देत असते. पावसाळी शेड ३० सप्टेंबरनंतर संबंधित हॉटेल व इतर व्यावसायिकांनी स्वत:हून काढणे आवश्यक असते.
परंतु नवी मुंबईमध्ये या सुविधेचा व्यावसायिक गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिक पावसाळ्यात शेडची परवानगी घेतात व सदर शेड वर्षभर तसेच ठेवले जाते.
या शेडचा व्यावसायिक वापर करण्यात येत आहे. अनेकांनी शेडखाली टेबल, खुर्च्या ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. काहींनी किचन तर काहींनी स्टोअर रूम तयार केली आहे. अनेक व्यावसायिकांनी फास्ट फूड, पानटपरी व इतर व्यावसायिक कामांसाठी या जागेचा वापर सुरू केला आहे.
वाशीतील नवरत्न हॉटेलचालकांनी पानटपरी, ग्राहकांना बैठक व्यवस्था व भांडी ठेवण्यासाठी वापर सुरू केला आहे. वैदेही बारने या जागेमध्ये मद्यपानासाठी उपयोग सुरू केला आहे.
(प्रतिनिधी)
शहरातील हॉटेलना ३० नोव्हेंबरपर्यंत पावसाळी शेडला परवानगी देण्यात आली आहे. सर्व शेड संबंधितांनी तत्काळ हटवावीत. जर स्वत:हून शेड न काढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शहरातील काही हॉटेलचालकांनी स्वत:हून शेड हटविले आहेत. ज्यांनी हटविले नाहीत त्यांच्यावर सोमवारपासून धडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- डॉ. कैलास गायकवाड,
सहआयुक्त, अतिक्रमण विभाग
> मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नानक, नानुमल, भगत ताराचंद व इतर सर्व हॉटेलचालकांनी शेडचा चुकीचा वापर केला आहे. पोलीस स्टेशनजवळ असलेल्या एक हॉटेलने अधिकृत जागेत वातानुकूलित व अतिक्रमण केलेल्या जागेचा इतर ग्राहकांसाठी वापर सुरू केला आहे. नेरूळमधील द्वारका व इतर हॉटेल परिसरामध्येही मार्जिनल स्पेसमध्ये पावसाळी शेड टाकून व्यवसाय सुरू केला आहे.
बेलापूर, कोपरखैरणे व इतर सर्वच परिसरामध्ये हीच स्थिती आहे. वास्तविक आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेड व्यावसायिकांनी स्वत:हून काढून टाकणे आवश्यक आहे. महापालिकेने तशा नोटीसही दिल्या आहेत. विभाग अधिकाऱ्यांना
सूचना दिल्या आहेत, परंतु सदर सूचनांचे पालन केले जात
नाही.

Web Title: Hotel operators broke the rules of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.