हॉटेलमधील वेटर सिद्धेश म्हाबदीने वाचवले ८ जणांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:32 AM2018-10-03T02:32:35+5:302018-10-03T02:33:38+5:30
विलेपार्ले दीक्षित रोड येथे सॅटेलाइट हॉटेलशेजारील विहिरीचा स्लॅब कोसळून सायंकाळी घडलेल्या घटनेत चिमुरडीसह दोन महिलांना हकनाक जीव गमवावा लागला
मनोहर कुंभेजकर
मुंबई : विलेपार्ले दीक्षित रोड येथे सॅटेलाइट हॉटेलशेजारील विहिरीचा स्लॅब कोसळून सायंकाळी घडलेल्या घटनेत चिमुरडीसह दोन महिलांना हकनाक जीव गमवावा लागला. मात्र या दुर्घटनेत नजीकच्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या सिद्धेश म्हाबदीने प्रसंगावधान दाखवत तब्बल ८ महिलांचे प्राण वाचवल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या या धाडसाचे विभागातून कौतुक केले जात आहे.
दापोली मंडणगड येथील रहिवासी असलेला सिद्धेश गेल्या काही काळापासून या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी काम करत आहे. नेहमीप्रमाणे सिद्धेश हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होता. मात्र अचानक विभागात गोंधळ सुरू झाल्याचे पाहून त्याने तत्काळ हॉटेलबाहेर धाव घेतली. विहिरीचा स्लॅब कोसळल्याने काही महिला विहिरीत पडल्याचे चित्र त्याने पाहिले. क्षणाचाही विलंब न करता सिद्धेश त्यांच्या मदतीसाठी धावला. त्याने विहिरीत बांबू सोडत बुडत्या महिलांना आधार दिला तसेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता उरलेल्या महिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. एकूण ८ महिलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात सिद्धेशला यश आले.
या दुर्घटनेची माहिती कळताच विलेपार्लेचे भाजपा आमदार अॅड. पराग अळवणी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याशिवाय स्थानिक शिवसैनिक मंगेश नाईक, मुन्ना साबळे, नितीन डिचोलकर यांच्यासह अनेक शिवसैनिक अग्निशमन दलाच्या मदतीसाठी पोहोचले होते. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित क्रेन मागवून मदतकार्य गतिमान केले. तसेच पोलीस यंत्रणा तैनात केल्याची माहिती प्रशासनाने दिली.