पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:21 AM2019-07-29T02:21:53+5:302019-07-29T02:22:05+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे
पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्गांवर कोकण रेल्वेच्या पुलाखाली ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चालकांना तासन्तास रेंगाळत राहावे लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने, सखल भागात पाणी साचल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडदेखील उभारण्यात आले आहे. मात्र, ओएनजीसी परिसरात पुलाखाली पाणी साचते. वर रेल्वेचे ट्रॅक असल्याने या ठिकाणी एमएसआरडीसीला काहीही करता येत नाही. प्रशासनाच्या समन्वयाअभावी सध्याच्या घडीला येथील प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कोकण, पुण्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचले होते. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळेदेखील अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ वाढत असल्याने सुमारे दोन ते तीन तास रांगा लागल्या होत्या. वाहनांची रांग थेट पनवेलजवळील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात पोहोचली होती. यावेळी पळस्पे फाट्याजवळ जाण्यासाठी नांदगाव मार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. लहान पूल पाण्याखाली गेल्याने चालकांना कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले.
शिवकर, काळुंदे भिंगार, कोन, आजिवली, पळस्पे, नांदगाव येथील नागरिकांना दररोज याच मार्गांवरून ये-जा करावी लागते. मात्र, या वाहतूककोंडीत अडकल्याने अवघ्या दहा मिनिटांसाठी रहिवाशांना दोन तास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढत असल्याने, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना तासन्तास वेळ, इंधन वाया घालवावे लागत आहे. या मार्गावर टोल वसूल करणाºया आयआरबी कंपनीला टोल घेण्याचा अधिकार नाही. सोमवारी आयआरबी प्रशासनाची भेट घेऊन, मार्ग त्वरित दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. काळुंद्रे येथील रहिवासी विशाल म्हस्कर यांनीदेखील वाहतूककोंडीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले. मार्गावरून प्रवास करणे म्हणजे दोन तासांची रखडपट्टी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.
2पाऊस पडल्यावर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते. पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबविली जात नाही. एमएसआरडीसी , आयआरबी, पालिका या प्रशासनामार्फत एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ओएनजीसी परिसरात साचलेले पाणी व पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसी प्रशासनाशी अनेक पत्रव्यवहार केले आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद दिला जात नाही. या वाहतूककोंडीमुळे वाहतुक पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- अभिजित मोहिते,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
पनवेल वाहतूक शाखा