मुलाचा अंत्यविधी सुरू असताना घराला आग; कुटुंबावरील दुहेरी संकटानं परिसरात हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 06:58 AM2019-06-24T06:58:53+5:302019-06-24T12:47:39+5:30
एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे घर जळाल्याचा प्रकार तुर्भे हनुमाननगर परिसरात घडला.
नवी मुंबई : एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे घर जळाल्याचा प्रकार तुर्भे हनुमाननगर परिसरात घडला. अरुण लाडके यांच्यावर एकाच वेळी ओढावलेल्या दोन संकटांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
हनुमाननगर येथे राहणाऱ्या अरुण लाडके यांचा मुलगा शिवम (२३) याचा शनिवारी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. शिवम हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनामुळे लाडके कुटुंब दु:खात होते. त्यानुसार शनिवारी दुपारी हनुमाननगर येथील स्मशानभूमीत शिवम याच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्याच वेळी दुसरीकडे लाडके यांच्या घरालाही आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख तय्यब पटेल, भाजप प्रदेश सचिव सुरेश गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी महावितरणला कळवून तत्काळ परिसराचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर पाण्याचा मारा करून घरामध्ये लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.
...तर परिसराला धोका निर्माण झाला असता
जर ही आग अधिक पसरली असती, तर विद्युत वायरमुळे संपूर्ण परिसराला धोका निर्माण झाला असता; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला. या प्रकारामुळे लाडके कुटुंबावर एकाच वेळी ओढावलेल्या दोन संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून मदतीचा हातभार लावला जात आहे.