पनवेल : स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावीत यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या दिवंगत दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पुढाकार घेऊन पाठपुरावा सुरू केला. हाच संघर्ष समितीचा मुख्य अजेंडा असल्याचे मत शुक्रवारी खारघर येथे पार पडलेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करण्यासाठीचा पहिला टप्पा म्हणून ही बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी खासदार बारणे यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले, समितीचा अजेंडा नैसर्गिक पद्धतीने गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करणे हा आहे. गरजेपोटी घरांचा उल्लेख आपण रहिवासी आणि व्यापारी असा न करता हे आपले बांधकाम आहे असेच म्हटले पाहिजे. या बैठकीला प्रशांत पाटील, सुदाम पाटील, आर. सी. घरत आदींनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार, समितीचे सल्लागार श्रीरंग बारणे, पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने दिवंगत दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, प्रशांत पाटील, आर. सी. घरत, समितीचे सचिव सुदाम पाटील, सेनेचे तालुका संघटक भरत पाटील आदींसह पदाधिकारी आणि सदस्य तसेच शेतकरी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
अहवाल सादर करण्याचे आदेशमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ठाणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज हेच समितीचे खऱ्या अर्थाने यश आहे. एकाही प्रकल्पग्रस्ताच्या घराला हात लावू दिला जाणार नसल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.