नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोने आतापर्यंत चोवीस हजार घरांची योजना जाहीर केली आहे. यात यशस्वी ठरलेल्या सुमारे अकरा हजार ग्राहकांना ऑक्टोबर २०२० आणि मार्च २०२१ या दोन टप्प्यात घरांचा ताबा देण्याचे जाहीर केले होते. परंतु कोरोना आणि इतर कारणांमुळे ग्राहकांना घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे हवालदील झालेल्या ग्राहकांना सिडकोने आता जून महिन्याची डेडलाइन दिली आहे.
सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये १४ हजार ८३८, तर २०१९ मध्ये ९ हजार घरांची सोडत काढली. संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहे.
समान सहा हप्त्यात घराचे पैसे भरण्याच्या सूचना संबंधित ग्राहकांना देण्यात दिल्या गेल्या. त्यानुसार अनेक ग्राहकांनी बँका आणि विविध वित्तसंस्थांकडून कर्ज घेऊन सिडकोचे हप्ते आदा केले आहेत. घराचे हप्ते भरलेल्या ११ हजार ग्राहकांना रेरा कायद्यानुसार ऑक्टोबर २०२० आणि मार्च २०२१ अशा दोन टप्यात घरांचा ताबा देण्याचे सिडकोने जाहीर केले होते. परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक कारणांमुळे सिडकोला ही डेडलाइन पाळता आला नाही. परंतु ग्राहकांच्या रेट्यानंतर सिडकोने आता जून महिन्याचा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. त्यानुसार दोन्ही टप्प्यातील अकरा हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील पात्र ग्राहकांना घराचा ताबा दिला जाणार आहे.
शिल्लक घरांसाठी सोडत काढणार
बँका व वित्तसंस्थांच्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत. तसेच स्वप्नातील घराच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे बँकांच्या कर्जाचे हप्ते आणि घरभाडे असा दुहेरी भुर्दंड या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, सिडकोने यापूर्वी काढलेल्या सोडतीतील सात हजार घरे शिल्लक आहेत. दोन टप्प्यातील घरांचा ताबा देत असतानाच शिल्लक घरांसाठीसुध्दा सोडत काढली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.