पनवेल : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जवळपास साडेचार हजार झोपडपट्टीतीलधारकांना ३०० स्केअर फुटांची घरे देणार असून लवकरच पनवेल महापालिका झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नागरिकांना दिले. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘संवाद आयुक्तांशी’ हा उपक्र म राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रविवारी खारघर येथील वासुदेव बळवंत उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांनी सुमारे तीन तास नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आयुक्तांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेचा डीपी प्लॅन, भविष्यातील प्रकल्प, पाण्याचा प्रश्न, सिडको हस्तांतरण प्रक्रिया यासह महापालिकेच्या संबंधित महत्त्वाच्या बाबींची माहिती नागरिकांना दिली. या वेळी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, २३ ग्रामपंचायतीच्या हस्तांतरणाचा प्रश्न, ३८४ कामगारांचे रखडलेले पगार, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न, सार्वजनिक शौचालय, पोस्ट आॅफिस, रात्र निवारा केंद्र आदींसह अनेक प्रकारचे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. भाजपाचे प्रभाकर जोशी, माजी उपसरपंच संतोष गायकर, खारघर कॉलनी फोरमचे अर्जुन गरड यांनी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्यात तसेच त्यांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी या वेळी केली. याव्यतिरिक्त सिडकोच्या फेरीवाला धोरण समितीचे सदस्य निलेश बाविस्कर यांनी फेरीवाल्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आयुक्तांना माहिती दिली. कार्यक्रमात १००हून अधिक नागरिकांनी आयुक्तांना प्रश्न विचारले. आयुक्तांनी समाधानकारक उत्तर देत पनवेल शहर महापालिका देशात एक नंबरची बनविण्याचा प्रयत्न करणार असून नवी मुंबई महापालिकेपेक्षा पनवेल महापालिकेचे कर निश्चित कमी असेल, असा विश्वास व्यक्त केला.
४,५०० झोपडपट्टीधारकांना देणार घरे
By admin | Published: February 13, 2017 5:17 AM